प्रारूप मतदार याद्यांत गंभीर चुका

 ठाणे महानगरपालिका प्रशासनाचा बेजबाबदार कारभार


छाननी कालावधी किमान १५ दिवसांनी वाढविण्याची मागणी

दिवा \ आरती परब : ठाणे महानगरपालिकेकडून २० नोव्हेंबर रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी प्रारूप मतदार याद्या जाहीर करण्यात आल्या. मात्र, याद्या जाहीर होऊन चार दिवस उलटूनही वार्ड क्रमांक २७ आणि २९ यांच्या याद्या २४ नोव्हेंबरपर्यंत सर्वांना उपलब्ध न केल्याने प्रशासनाचा बेजबाबदार कारभार उघड झाला आहे. लोकशाही प्रक्रियेचा हा उघड अवमान असल्याची तीव्र प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.


याशिवाय, वार्ड क्रमांक २८ च्या मतदार यादीतही मोठ्या विसंगती दिसून आल्या आहेत. वार्ड २७ मधील “यादी क्रमांक ४६” ही चुकून वार्ड २८ मध्ये सरकविण्यात आली असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही चूक केवळ तांत्रिक नसून मतदारांच्या अधिकारांवर, प्रभागनिहाय लोकसंख्येच्या संतुलनावर आणि स्थानिक प्रतिनिधित्व यावर गंभीर परिणाम करणारी ठरू शकते. या चुकीमुळे वार्ड २७ मधील मतदाराला चुकीच्या प्रभागात मतदान करावे लागणार असून निवडून येणारा नगरसेवकही त्या मतदाराच्या मूळ प्रभागातील प्रश्‍न सोडवू शकणार नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे.


या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख ॲड. रोहिदास मुंडे यांनी प्रारूप मतदार याद्यांच्या छाननीसाठी किमान १५ दिवसांची अतिरिक्त मुदतवाढ तात्काळ जाहीर करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. तसेच वार्ड २७ मधील “यादी क्रमांक ४६” मूळ प्रभागात त्वरित पुनर्स्थापित करण्याची मागणीही करण्यात आली आहे.


मतदार याद्यांतील सर्व विसंगती तातडीने दुरुस्त करून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून कारवाईची लेखी नोंद घेण्यात यावी, अशी स्पष्ट भूमिका यावेळी व्यक्त करण्यात आली. लोकशाहीचा पाया हा अचूक आणि पारदर्शक मतदार यादीत आहे, परंतु महापालिकेच्या हलगर्जी पणामुळे नागरिकांचा विश्वास डळमळत असल्याचा आरोपही करण्यात आला. निवेदन देताना ॲड. रोहिदास मुंडे, दिवा शहर प्रमुख सचिन पाटील, विभाग प्रमुख चेतन पाटील, हेमंत नाईक उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post