महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय बागुल यांचे आवाहन
ठाणे : मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेअंतर्गत ठाणे जिल्ह्यातील सर्व लाभार्थ्यांनी आपली ई-केवायसी प्रक्रिया १८ नोव्हेंबर २०२५ पूर्वी पूर्ण करणे बंधनकारक आहे, असे आवाहन महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय बागुल यांनी केले आहे.
ही योजना राज्य शासनाने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू केली असून पात्र महिलांना दरमहा आर्थिक मदत दिली जाते. मात्र, ही मदत सातत्याने मिळत राहण्यासाठी लाभार्थ्यांची ई-केवायसी (e-KYC) पूर्ण असणे आवश्यक आहे.
ई-केवायसी प्रक्रियेद्वारे लाभार्थ्यांच्या आधार क्रमांक, बँक खाते आणि मोबाईल क्रमांकाची पडताळणी केली जाते. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील हप्त्यांचे अनुदान कोणत्याही अडथळ्याशिवाय थेट त्यांच्या खात्यात जमा होईल.
ई-केवायसीसाठी लाभार्थ्यांनी आपल्या संबंधित अंगणवाडी केंद्र, ग्रामपंचायत, महिला व बालविकास कार्यालय किंवा जवळच्या CSC (कॉमन सर्व्हिस सेंटर) येथे जाऊन आवश्यक कागदपत्रांसह (आधार कार्ड, बँक पासबुक आणि मोबाईल क्रमांक) आपली माहिती अद्ययावत करावी.
ज्या लाभार्थ्यांनी निर्धारित मुदतीत ई-केवायसी पूर्ण केली नाही, त्यांच्या खात्यातील अनुदान रक्कम तात्पुरती स्थगित राहू शकते. त्यामुळे सर्व पात्र महिलांनी १८ नोव्हेंबर २०२५ पूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करून योजनेचा लाभ अखंडपणे सुरू ठेवावा, असे आवाहन बागुल यांनी केले आहे.
