कल्याण \ शंकर जाधव : आठ महिन्याच्या बाळाला पळवून नेणाऱ्या तरुणाला त्याच्या आत्यासह कल्याण लोहमार्ग पोलीस आणि महात्मा फुले पोलिसांनी सहा तासात अटक केली. ही घटना कल्याण रेल्वे स्थानकात घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय खरे व त्याची आत्या सविता खरे अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.निलेश कुंचे हे पत्नी व तीन मुलासह पूण्याहून कल्याणला आले होते. हे कुटुंब मजूरीचे काम करतात. काम मिळाले नाही व राहण्यासाठी जागा ही मिळाली नाही. त्यामुळे निलेश कुंचे हे त्यांची पत्नी पूनम कुंचे यांच्यासह तीन मुले स्टेशनवर झोपले असताना हा प्रकार घडला होता. संधीचा फायदा घेत याठिकाणी आठ महिन्याच्या बाळाला उचलून एका तरुणाने व त्याच्या आत्याने पळ काढला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली होती.
कल्याण लोहमार्ग पोलीस व महात्मा फुले पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला.पोलिसांनी सहा तासाच्या अक्षय व सविता यांना अटक करून बाळाची सुटका करत त्याला आई- वडिलांच्या स्वाधीन केले. अटक केलेल्या दोघांचा बाळाची चोरी करण्यामागे त्यांचा हेतू काय होता याचा पोलीस तपास पोलीस करीत आहेत.
