दिवा स्टेशन परिसरात रिक्षाचालकांची बेशिस्ती वाढली



शिवशक्ती रिक्षाचालक- मालक संघटनेची पोलिसांकडे कडक कारवाईची मागणी

दिवा \ आरती परब : दिवा स्टेशन परिसरातील रिक्षा स्टँडवर वाढत्या वाहतूक कोंडीसोबतच काही रिक्षा चालकांच्या बेशिस्त वागणुकीमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, शिवशक्ती रिक्षाचालक-मालक संघटना (नोंदणी क्र. १७११/२०१८) यांनी पोलीस प्रशासनाकडे तातडीने कठोर कारवाईची मागणी केली आहे.


संघटनेच्या म्हणण्यानुसार, ओव्हरब्रिजचे काम सुरू असल्याने आधीच वाहतूककोंडी होत आहे. त्यात रेल्वे गेटजवळ २- व्हिलर आणि ४- व्हिलर वाहने अनियमितपणे उभी केल्याने साबेगावाकडे जाणारा मुख्य रस्ता अडवला जातो. त्यामुळे वाहतूक सुरळीत करण्याची जबाबदारी रिक्षा संघटनेवर येते. या परिस्थितीचा गैरफायदा घेत काही रिक्षाचालक तसेच महिला रिक्षाचालक लाईन तोडून पुढे जाऊन प्रवासी भरतात. त्यांना नियमाविषयी विचारणा केली असता शिवीगाळ, दादागिरी, तसेच जातीचा धाक दाखवून धमकावल्याचे प्रकार वाढल्याचे संघटनेने सांगितले. महिलांना रोखल्यास “तुमच्या नावाची तक्रार करतो” अशी धमकी देऊन पोलिसांत जाण्याची भीती दाखवली जात असल्याची माहिती दिली आहे.


तसेच भूमिपुत्र आणि नवीन रहिवासी रिक्षाचालकांमध्ये मनमानी पद्धतीने कारभार सुरू असल्याने रिक्षा युनियनला सतत त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार पोलिसांत करण्यात आली आहे. संघटनेने प्रशासनास स्पष्ट इशारा दिला आहे की जर वेळेत कारवाई झाली नाही, तर परिस्थिती बिघडून मोठा उद्रेक होऊ शकतो आणि रिक्षा युनियनला बेमुदत संपावर जावे लागू शकते.


शासनाने महिलांना स्वावलंबनासाठी गुलाबी रिक्षा देऊन परवाने ही दिले असताना मात्र त्या गुलाबी रिक्षांवर दिवसरात्र पुरुष रिक्षाचालकांकडून वाहन चालवले जात असल्याचेही त्यांनी पोलीसांच्या निदर्शनास आणले. त्यामुळे या गैरप्रकारांची सखोल चौकशी करून महिला रिक्षा चालकांना व गरीब रिक्षा चालक- मालकांना न्याय द्यावा, अशी संघटनेची मागणी आहे.

शिवशक्ती रिक्षाचालक- मालक संघटनेने पोलीस प्रशासनाकडे तातडीने हस्तक्षेप करून रिक्षा स्टँडवरील अव्यवस्था दूर करण्याची आणि बेशिस्त रिक्षाचालक- मालकांवर कडक कारवाई करण्याची विनंती केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post