प्रबोधनकार ठाकरे प्राथमिक शाळा क्रमांक १९ येथे आयुक्तांच्या उपस्थितीत उद्घाटन
कल्याण : महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभाग, शिक्षण विभाग तसेच महिला व बालकल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हेपिटायटिस-A मोफत लसीकरण मोहिमेचा शुभारंभ आज कल्याण पूर्व, नेतिवली येथील प्रबोधनकार ठाकरे प्राथमिक शाळा क्रमांक १९ येथे महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
महापालिका शाळांमधील इयत्ता १ ते ८ मधील विद्यार्थ्यांना ही लस मोफत देण्यात येणार आहे. यकृतावर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून ही मोहीम राबविण्यात येत असल्याचे आयुक्त गोयल यांनी सांगितले. तसेच, शिक्षकांनी पालक मेळावा आयोजित करून या लसीचे महत्त्व पालकांना समजावून सांगावे, अशी सूचना त्यांनी दिली. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना “अभ्यासाबरोबरच इतर कलागुणांचेही संवर्धन करा आणि स्वप्ने पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करा”, असे मार्गदर्शन त्यांनी केले.
दूषित पाणी व दूषित अन्नामुळे होणारा विषाणूजन्य आजार हेपिटायटिस-A रोखण्यासाठी हे लसीकरण अत्यंत आवश्यक असल्याचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपा शुक्ल यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना या लसीचे दोन डोस दिले जाणार असून पहिल्या डोसनंतर सहा महिन्यांनी दुसरा डोस देण्यात येईल. पालकांची संमती मिळाल्यानंतर ही मोहीम महापालिकेच्या इतर शाळांमध्येही राबविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
उद्घाटन कार्यक्रमास महापालिका उपायुक्त कांचन गायकवाड, संजय जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉ. पूर्णिमा ढाके, डॉ. दिपाली मोरे, प्रशासन अधिकारी भारत बोरनारे, समाज विकास अधिकारी प्रशांत गवाणकर, अधिकारी वर्ग, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.