कल्याण - डोंबिवली महापालिकेतर्फे मतदार मदत कक्ष स्थापन
कल्याण : कल्याण- डोंबिवली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारांना मतदार यादीत आपले नाव सहज शोधता यावे, यासाठी कल्याण -डोंबिवली महानगरपालिकेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. महापालिकेच्या मुख्यालयातील नागरिक सुविधा केंद्रात मतदार मदत कक्ष (Help Desk) सुरू करण्यात आला असून याचा शुभारंभ सोमवारी महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या उपस्थितीत झाला.
मतदारांना नाव शोधण्यासाठी राज्य शासनाने उपलब्ध केलेल्या http://mahasecvoterlist.in/ या संकेतस्थळासोबतच महापालिकेने https://kdmc.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर देखील NAME WISE किंवा EPIC NUMBER WISE शोधण्याची सुविधा उपलब्ध केली आहे.
महापालिकेच्या सर्व प्रभागातील नागरिक सुविधा केंद्रांमध्येही अशाच प्रकारचे मदत कक्ष सुरु करण्यात येत असल्याची माहिती उपायुक्त (निवडणूक व आयटी) समीर भूमकर यांनी दिली.
या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे, सिस्टम मॅनेजर प्रमोद कांबळे, निवडणूक विभागाचे अधीक्षक जयराम शिंदे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

