डोंबिवली \ शंकर जाधव : आगरी युथ फोरमच्या वतीने आयोजित २१ वा अखिल भारतीय आगरी महोत्सव शुक्रवार १२ ते १९ डिसेंबर या कालावधीत श्री संत सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल, डोंबिवली पूर्व येथे उत्साहात संपन्न होणार आहे.
या महोत्सवाचा उद्घाटन सोहळा शुक्रवार, १२ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता आयोजित करण्यात आला असून, भारतीय क्रिकेट संघाचे कसोटी क्रिकेटवीर निलेश कुलकर्णी आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
उद्घाटनप्रसंगी आगरी समाजाचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार रामशेठ ठाकूर, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, ज्येष्ठ सामाजिक नेते दशरथ पाटील, माजी केंद्रीय मंत्री व वनमंत्री गणेश नाईक, खासदार सुरेश म्हात्रे (बाल्या मामा), माजी खासदार संजय दिना पाटील, तसेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
या सोहळ्यासाठी समाजातील अनेक ज्येष्ठ नेते, आजी-माजी लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती आगरी युथ फोरमचे अध्यक्ष शरद पाटील आणि गुलाब वझे यांनी पत्रकार परिषदेत दिली. महोत्सवाच्या काळात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, आगरी समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
