दिवा \ आरती परब : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त सार्वजनिक जयंती उत्सव मंडळाच्या वतीने दिव्यात महापरिनिर्वाण दिनानिमित्त ५ डिसेंबर रोजी रात्री भव्य मेणबत्ती शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीपूर्वी मंडळाचे अध्यक्ष दिनेश पाटील आणि कार्याध्यक्ष दीपक जाधव यांनी सिद्धार्थ बुद्ध विहार तसेच जय भीम स्तंभ येथे भगवान बुद्धांची प्रतिमा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
मेणबत्ती रॅलीची सुरुवात सम्यक समता मंडळ, दातिवली तलाव (दिवा आगासन रोड, बी.आर. नगर) येथून करण्यात आली. त्यानंतर रॅली सिद्धार्थ बुद्ध विहार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे दिवा-शिळ रोडने पुढे जात दिवा रेल्वे स्टेशनजवळील जय भीम स्तंभ येथे पोहोचली. येथे मध्यरात्री १२ वाजता बुद्ध वंदना घेऊन रॅलीची सांगता करण्यात आली.
६ डिसेंबरला पहाटेपासून दिवाभर धम्म बांधव, भगिनी तसेच सामाजिक, धार्मिक आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी जय भीम स्तंभावर उपस्थित राहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन केले. शहरात शांतता, बंधुता आणि सामाजिक समतेचा संदेश देणारा हा कार्यक्रम अत्यंत श्रद्धाभावाने संपन्न झाला.
