दिव्यातील सिमेंट काँक्रीटचा रस्ता कोणी बुजवला?


अमोल केंद्रे यांनी केली शोधमोहीम

दिवा \ आरती परब : सेंट मेरी शाळेच्या मागील बाजूस आरती अपार्टमेंट, श्लोक नगर फेज– २ कडे जाणारा सिमेंट काँक्रीटचा रस्ता अचानक गायब झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. नागरिकांच्या तक्रारीनंतर प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली असता त्या ठिकाणी संपूर्ण चिखल, सांडपाणी वाहत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे या मार्गावरून ये– जा करणाऱ्या नागरिकांना व शाळकरी विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.


या पार्श्वभूमीवर समाजसेवक अमोल धनराज केंद्रे यांच्या नेतृत्वाखाली अश्विनी अमोल केंद्रे, अनिल मौर्या, कमलेश गुप्ता, सुरेखा तोरणे, संध्या माने, अश्विनी माने, रुपाली कांबळे, सरिता बारस्कर व स्मिता कांबळे यांनी घटनास्थळी पाहणी करून रस्ता खोदून तपासणी केली. यावेळी सुमारे दीड फूट खोल खाली सिमेंट काँक्रीटचा पक्का रस्ता असल्याचे स्पष्ट झाले.


स्थानिकांनी सांगितले की, सेंट मेरी शाळेच्या मागील हा रस्ता पूर्वी खराब अवस्थेत होता. मात्र १ ते २ वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्च करून तो संपूर्ण सिमेंट काँक्रीटचा करण्यात आला होता. त्यानंतर रस्त्याच्या बाजूला असलेल्या चाळी पाडून नव्या इमारती उभारण्यात आल्या. त्यामुळे रस्त्याची पातळी खाली गेली व पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचू लागले. या समस्येवर उपाय म्हणून संबंधित बिल्डरांनी मातीचा भराव टाकून रस्ता वर केल्याचा आरोप अमोल केंद्रे यांनी केला आहे.


हा रस्ता दिवा प्रभाग समितीने तयार केलेला असून, तो बुजवण्यासाठी कोणतीही पालिकेची परवानगी घेण्यात आलेली नाही. पालिका अधिकारी आणि बिल्डर लॉबी यांच्या संगनमतामुळेच हा प्रकार घडल्याचा गंभीर आरोपही केंद्रे यांनी केला आहे.


सदर रस्ता मंगळवारपर्यंत जेसीबीच्या साहाय्याने खोदून पूर्ववत व व्यवस्थित करून द्यावा, अशी ठाम मागणी धडाकेबाज युवा प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्याचे संस्थापक- अध्यक्ष अमोल धनराज केंद्रे व अश्विनी केंद्रे यांनी दिवा प्रभाग समितीकडे केली आहे. नागरिकांच्या व विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ थांबवला नाही आणि रस्ता तातडीने दुरुस्त केला नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी पालिका प्रशासनाला दिला आहे.



Post a Comment

Previous Post Next Post