दिवा \ आरती परब : शिवसेना शिंदे पक्षाच्या वतीने प्रभाग क्रमांक २९ मधून अर्चना निलेश पाटील यांनी आज अत्यंत उत्साहात आणि भव्य शक्तिप्रदर्शनाच्या वातावरणात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी प्रभागातील शेकडो नागरिक, महिला, पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अर्चना पाटील यांना जाहीर पाठिंबा दर्शवला.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी काढण्यात आलेल्या भव्य रॅलीत शिवसैनिकांचा जोश पाहण्यास मिळाला. महिला व युवकांचा मोठा सहभाग हे या रॅलीचे विशेष आकर्षण ठरले. रॅलीच्या सुरुवातीला परिसरातील महिलांनी अर्चना पाटील यांचे औक्षण करून उमेदवारी अर्ज भरण्यास शुभेच्छा दिल्या. त्यानंतर ब्रास बँडच्या सुमधुर संगीतावर ही रॅली दिवा स्टेशनपर्यंत काढण्यात आली.
रॅलीदरम्यान नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत अर्चना पाटील यांना शुभेच्छा व आशीर्वाद दिले. त्यांच्या उमेदवारीमुळे प्रभागात सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, उमेदवारी अर्ज दाखल करताना झालेली प्रचंड गर्दी ही आगामी बदलाची नांदी असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होती.
यावेळी बोलताना अर्चना निलेश पाटील म्हणाल्या की, उपमुख्यमंत्री व खासदारांच्या मार्गदर्शनाखाली शहरात सुरू असलेल्या विकासकामांमुळे जनतेचा विश्वास शिवसेनेवर अधिक दृढ झाला आहे. या विकासाच्या जोरावर आणि नागरिकांच्या पाठिंब्याने या निवडणुकीत निश्चितपणे यश मिळेल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

