नवी मुंबईत बहुसदस्यीय पद्धतीमुळे व्यापक मतदार जनजागृतीची गरज

 


१ ते २७ प्रभागांत ४ वेळा मतदान, तर २८ व्या प्रभागात ३ वेळा मतदान

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात येत्या १५ जानेवारी २०२६ रोजी होणारी महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक ही पालिकेच्या इतिहासात प्रथमच बहुसदस्यीय पद्धतीने पार पडत आहे. त्यामुळे मतदारांनी मतदान करताना विशेष दक्षता घेणे आवश्यक असून व्यापक जनजागृतीची गरज निर्माण झाली आहे.

महानगरपालिका क्षेत्रातील एकूण २८ प्रभागांपैकी प्रभाग क्रमांक १ ते २७ मध्ये ‘अ’, ‘ब’, ‘क’, ‘ड’ असे चार सदस्यीय उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तर प्रभाग क्रमांक २८ मध्ये ‘अ’, ‘ब’, ‘क’ असे तीन सदस्य निवडले जाणार आहेत.

यामुळे प्रभाग क्रमांक १ ते २७ मधील प्रत्येक मतदाराने चार वेगवेगळ्या जागांसाठी प्रत्येकी एक असे एकूण ४ मते, तर प्रभाग क्रमांक २८ मधील मतदारांनी तीन वेगवेगळ्या जागांसाठी प्रत्येकी एक असे एकूण ३ मते देणे आवश्यक आहे.


मतदान यंत्रावरील रंगानुसार मतदान

बहुसदस्यीय पद्धतीत मतदान सुलभ व्हावे यासाठी मतदान यंत्रावर प्रत्येक जागेसाठी वेगवेगळ्या रंगाची मतपत्रिका ठेवण्यात आली आहे.

‘अ’ जागेसाठी : पांढरा रंग

‘ब’ जागेसाठी : फिकट गुलाबी रंग

‘क’ जागेसाठी : फिकट पिवळा रंग

‘ड’ जागेसाठी : फिकट निळा रंग

मतदारांनी प्रत्येक जागेसाठी फक्त एकच मत द्यायचे आहे. एका जागेसाठी एकापेक्षा अधिक मते देता येणार नाहीत. चारही (किंवा तीन) जागांसाठी मतदान केल्यानंतर ‘बीप’ असा आवाज येईल, तो मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्याचा संकेत आहे.

कोणताही उमेदवार पसंत नसेल, तर प्रत्येक जागेसाठी उमेदवारांच्या यादीच्या शेवटी ‘नोटा’ (None of the Above) हा पर्याय उपलब्ध असणार आहे.



Post a Comment

Previous Post Next Post