कोल्हापूर जिल्ह्यात संमिश्र निकाल


कोल्हापूर / शेखर धोंगडे : कोल्हापूर जिल्ह्यातील दहा नगरपालिका आणि तीन नगरपंचायतींचे निकाल जाहीर झाले असून या निवडणुकांत संमिश्र राजकीय चित्र पाहायला मिळाले आहे. नगराध्यक्षपदासाठी भाजपचे दोन, शिंदेसेनेचे दोन, जनसुराज्य पक्षाचे दोन तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे दोन उमेदवार विजयी झाले आहेत. उर्वरित पाच ठिकाणी स्थानिक आघाड्यांच्या उमेदवारांनी बाजी मारली आहे.


निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी मिरवणुकांवर प्रशासनाने बंदी घातली होती. मात्र अनेक ठिकाणी समर्थकांनी जल्लोष करत प्रशासनाचे आदेश धुडकावल्याचे चित्र दिसून आले. नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकांसाठी जिल्ह्यात २ डिसेंबर रोजी ७८.८७ टक्के इतके चुरशीचे मतदान झाले होते. तेरा नगराध्यक्षपदांसाठी ५६ उमेदवार, तर २५४ नगरसेवकपदांसाठी तब्बल ८०० उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते.


स्थानिक गरजेनुसार नेत्यांनी आघाड्या केल्यामुळे अनेक ठिकाणी राजकीय पक्षांची गणिते कोलमडली. जयसिंगपूरमध्ये आमदार राजेंद्र पाटील–यड्रावकर आणि भाजपचे सावकार मादनाईक यांच्या आघाडीला उद्धवसेनेचा पाठिंबा होता. येथे शाहू विकास आघाडीचे संजय पाटील यड्रावकर विजयी झाले. मात्र शिरोळमध्ये भाजपने आमदार पाटील यांच्या विरोधात जनसुराज्य पक्षाचे आमदार अशोकराव माने यांच्यासोबत आघाडी केली होती. येथे पृथ्वीराज यादव, राजू शेट्टी व गणपतराव पाटील यांच्या शिवशाहू आघाडीच्या योगिता कांबळे विजयी झाल्या.


गडहिंग्लजमध्ये काँग्रेस, शिंदेसेना आणि भाजप एकत्र लढले असतानाही राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे महेश तुरबतमठ यांनी नगराध्यक्षपदावर बाजी मारली. हुपरी, मुरगूड आणि चंदगड येथे भाजप व शिंदेसेना एकत्र लढली. चंदगडमध्ये भाजपचे सुनील काणेकर, हुपरीत भाजपचे मंगळराव माळगे, तर मुरगूडमध्ये शिंदेसेनेच्या सुहासिनी पाटील विजयी झाल्या. मुरगूडमध्ये शिंदेसेना–भाजप आघाडीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस मैदानात उतरली होती.


कागलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि समरजित घाटगे गटाच्या आघाडीने शिंदेसेनेचा पराभव करत मुश्रीफ–घाटगे गटाने वर्चस्व सिद्ध केले. येथे राष्ट्रवादी–शाहू आघाडीच्या सविता माने नगराध्यक्षपदी निवडून आल्या. आजऱ्यात भाजप–शिंदेसेना पुरस्कृत ताराराणी आघाडीचे अशोक चराटी विजयी झाले असून त्यांच्या विरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धवसेना एकत्र आली होती.





Post a Comment

Previous Post Next Post