भाजपकडून आयुक्तांकडे निवेदन
दिवा \ आरती परब : दिवा शहर तसेच कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीचे प्रारूप स्वरूप काही दिवसांपूर्वी जाहीर झाले. या याद्यांची तपासणी करताना १७,००० पेक्षा जास्त दुबार मतदारांची नावे आढळून आली आहेत. निवडणूक आयोगाने काही ठिकाणी ही दुबार नावे विशेषतः ‘२ स्टार’ चिन्ह देऊन दर्शविली आहेत.
मतदारांना निर्भेळ, अडथळा विरहित मतदानाचा अधिकार मिळावा आणि सर्व नावे तातडीने तपासून शोध निशा व्हावी, या मागणीसाठी भाजपा नेत्यांनी ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरव राव यांची भेट घेतली.
महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या भेटीसाठी भाजपच्या प्रतिनिधी मंडळात संदीप लेले, अध्यक्ष, भाजपा ठाणे शहर (जिल्हा), सचिन रमेश भोईर, अध्यक्ष, भाजपा दिवा शीळ मंडळ, विजय अनंत भोईर, उपाध्यक्ष, भाजपा ठाणे शहर, रोशन भगत, कार्यकारिणी सदस्य यांचा समावेश होता.
प्रतिनिधी मंडळाने आयुक्तांसमोर दुबार नावे तातडीने वगळणे, क्षेत्रानुसार वॉर्ड निहाय छाननी, अनियमित नोंदी काढून टाकणे, आणि अंतिम मतदार यादीत सर्व पात्र मतदारांची नावे निश्चित करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याची मागणी करणारे निवेदन सादर केले. हे निवेदन ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ आणि आयुक्त सौरव राव यांना देण्यात आले असून संबंधित विभागाकडून याप्रकरणी पुढील कारवाई अपेक्षित आहे.
