ठाणे : ‘मकून्स प्रीस्कूल’, ओवळा आणि कासारवडवली यांचा बहुप्रतीक्षित वार्षिक महोत्सव ‘एक्स्प्रेशन्स २०२५-२६’ ठाण्यातील काशीनाथ घाणेकर सभागृहात मोठ्या उत्साहात आणि टाळ्यांच्या गजरात पार पडला. लहानग्यांच्या आत्मविश्वासपूर्ण आणि मोहक सादरीकरणांना प्रोत्साहन देण्यासाठी पालक आणि पाहुण्यांची मकून्स वार्षिक महोत्सवाला उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. त्यानंतर स्वागत, दीपप्रज्वलन आणि प्रार्थना झाली. यंदाचा सोहळा ‘सीझन्स ऑफ लाइफ’ या थीमवर आधारित असल्याने सादर करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांत लहान मुलांमधील निरागसता, बदल आणि भावविश्व सुंदरपणे उलगडून दाखविण्यात आले.
प्लेग्रुप, नर्सरी, ज्युनिअर केजी आणि सिनिअर केजीमधील चिमुकल्यांनी उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या ऋतूंचे मनोहारी सादरीकरण केले. त्यामुळे रंगमंच अधिकच उजळून निघाला. ‘बचपन : रिलिव्ह युवर चाइल्डहुड’, खुसखुशीत मदर्स अॅक्ट, धमाल फादर्स अॅक्ट; तसेच ज्युनिअर केजीने सादर केलेला मजेदार ‘टीनएज स्किट’ यावर प्रेक्षक टाळ्या वाजवून आनंदाने दाद देत होते. ‘मीट द हीरोज बिहाइंड द सीन’ या भावपूर्ण उपक्रमातून शाळेच्या सहायक कर्मचाऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. त्यामुळे भावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
आपल्या भाषणात प्राचार्यांनी परिपूर्णतेपेक्षा आत्मविश्वासाला प्राधान्य दिले. ‘प्रत्येक मूल आपल्या गतीने विकसित होते. आज प्रत्येक विद्यार्थ्याने धाडसाने पुढे पाऊल टाकले. बालपण ही स्पर्धा नाही; ती जपण्यासारखी सुंदर यात्रा आहे,’ असेही प्राचार्यांनी नमूद केले.
पालकांचा वेळ, उपस्थिती आणि मुलांशी संवाद यांचे महत्त्व सांगून त्यांनी मुलांच्या आत्मविश्वासाच्या पायाभरणीतील महत्त्वाचे घटक असल्याचे नमूद केले. शिक्षक, सहाय्यक कर्मचारी, मदतनीस आणि शाळेच्या समुदायभावनेला बळ देणाऱ्या उत्साही पालकांचेही त्यांनी मन:पूर्वक आभार मानले. ‘हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गेले कित्येक आठवडे आमची टीम अथक परिश्रम घेत आहे. आज त्यांनी सलग अनेक कार्यक्रम सादर करून कामाप्रतीची निष्ठा दाखवून दिली आहे,’ या शब्दांत प्राचार्यांनी त्यांचे कौतुक केले.
कार्यक्रमात लहानग्यांना विविध पुरस्कारांनी आणि सन्मानपत्रांनी गौरविण्यात आले. त्यानंतर सादर केलेल्या एका सरप्राइज परफॉर्मन्सने सभागृहात टाळ्यांचा गजर झाला. शेवटी उपस्थितांचे आभार मानून हा संस्मरणीय सोहळा संपन्न झाला.



