राहुल गांधींविरोधातील सुनावणी २० डिसेंबर रोजी


भिवंडी :  २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रारंभी भिवंडी तालुक्यातील सोनाळे येथे ६ मार्च २०१४ रोजी काँग्रेस पक्षातर्फे आयोजित जाहीर सभेत राहुल गांधी यांनी “आरएसएसच्या लोकांनी महात्मा गांधींची हत्या केली,” असे कथित विधान केल्याचा आरोप आहे. या विधानाच्या विरोधात स्थानिक आरएसएस कार्यकर्ते राजेश कुंटे यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात दाखल केलेल्या फौजदारी मानहानी खटल्याची सुनावणी भिवंडी न्यायालयाने पुढे ढकलली आहे.

शनिवारी या खटल्याची सुनावणी होणार होती; मात्र सरकारी वकिलांच्या प्रमुख साक्षीदाराच्या अनुपस्थितीमुळे न्यायालयाने सुनावणी २० डिसेंबरपर्यंत तहकूब केली. प्रमुख साक्षीदार अशोक सायकर हे वैयक्तिक कारणांमुळे न्यायालयात हजर राहू शकले नाहीत, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.

राहुल गांधी यांचे वकील अ‍ॅड. नारायण अय्यर यांनी सांगितले की, येत्या २० डिसेंबर रोजी साक्षीदार अशोक सायकर यांची साक्ष नोंदवली जाण्याची शक्यता आहे. सध्या अशोक सायकर हे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे पोलीस उपअधीक्षक म्हणून कार्यरत आहेत.

या खटल्यात सायकर यांची साक्ष अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. कारण २०१४ मध्ये पोलीस उपनिरीक्षक असताना त्यांनी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम २०२ अंतर्गत या मानहानी प्रकरणाचा प्राथमिक तपास केला होता. त्यांच्या अहवालाच्या आधारेच न्यायालयाने नंतर राहुल गांधी यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ५०० अंतर्गत समन्स जारी केले होते.


Post a Comment

Previous Post Next Post