प्रवाशाला परत मिळाली हरवलेली बॅग




बेतवडेचे रिक्षाचालक सूरज पाटील प्रामाणिकपणाचा आदर्श

दिवा \ आरती परब :  माणूसकी आणि प्रामाणिकपणा आजच्या धावपळीच्या जगात दुर्मिळ होत चालला असला तरीही, बेतवडे गावातील रिक्षाचालक सूरज पाटील यांनी दाखवलेला प्रामाणिकपणा समाजात सकारात्मकतेचा संदेश देणारा आहे. दिव्यातील चिन्मय हाइट्स येथे राहणाऱ्या विद्या विलास बालगुडे यांची महत्वाची कागदपत्रे, रोख रक्कम असलेली बॅग रिक्षात राहिलेली लक्षात येताच त्या बॅगेच्या मालकिणीला शोधून त्यापर्यंत प्रामाणिकपणे पोहोचवली.


 विद्या बालगुडे या मुंबईवरून कामावरून परतत असताना दिवा पूर्व येथून गणेश नगरकडे जाण्यासाठी रिक्षा पकडली. घरी पोहोचताच घाईगडबडीत त्यांच्या लक्षात आले नाही की बॅग रिक्षातच राहिली आहे. दरम्यान, बेतवडे येथील रिक्षाचालक सूरज पाटील यांना बॅग रिक्षात असल्याचे दिसले. मालक कोण आहे हे समजण्यासाठी त्यांनी बॅग उघडली असता त्यात आधारकार्ड मिळाले. त्यावरील पत्त्याच्या आधारे त्यांनी तत्काळ गणेश नगर येथील शिवसेना शाखाप्रमुख राजेश पाटील व जनार्दन गुरव यांच्याशी संपर्क साधला.


यांच्या मदतीने विद्या बालगुडे यांच्याशी संपर्क झाला आणि हरवलेली बॅग त्यांना सुखरूप परत देण्यात आली. बॅग परत मिळताच बालगुडे यांना आनंदाच्या अश्रूंनी भरून आले.


बॅगमध्ये असलेली रोख रक्कम महत्वाची कागदपत्रे हरवल्यास मोठी धावपळ करावी लागली असती. पण रिक्षाचालक सूरज पाटील यांनी दाखविलेला प्रामाणिकपणा आजच्या काळात अनुकरणीय ठरला आहे. त्यांच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post