हणमंत जगदाळेंसह चार जणांना शिवसेनेची उमेदवारी
ठाणे : गत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेल्या लोकमान्यनगर–शास्त्रीनगरमधील चारही नगरसेवकांना शिवसेनेची उमेदवारी जाहीर करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द पाळल्याची भावना ज्येष्ठ नेते हणमंत जगदाळे यांनी व्यक्त केली आहे.
लोकमान्यनगर व शास्त्रीनगरच्या विकासाचे आश्वासन तत्कालीन मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. त्या विश्वासावर आम्ही चारही नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. आज शिवसेनेने आम्हा चौघांना उमेदवारी जाहीर करून एकनाथ शिंदे हे एकवचनी नेते असल्याचे पुन्हा सिद्ध केले आहे, असे हणमंत जगदाळे म्हणाले.
शिवसेना पक्षाने ठाणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ६ मधून हणमंत जगदाळे यांच्यासह प्रशांत (राजा) जाधवर, सरिता दिगंबर ठाकूर आणि वनिता संदीप घोगरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना जगदाळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले.
अनेक वर्षे विरोधी पक्षात काम करत असताना सत्तेअभावी प्रभागाचा विकास खुंटत असल्याची भावना निर्माण झाली होती. त्यामुळे मी आणि माझ्या तीनही सहकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, असे त्यांनी सांगितले.
लोकमान्यनगर आणि शास्त्रीनगरमधील रहिवाशांना क्लस्टर विकास योजनेच्या माध्यमातून हक्काचे, प्रशस्त घर देण्याचे स्वप्न असल्याचे सांगत जगदाळे म्हणाले, विरोधी पक्षनेते असताना मी एकनाथ शिंदे यांच्या खांद्याला खांदा लावून क्लस्टर विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले. मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांच्या हस्ते क्लस्टर विकासाचा नारळ फुटला. येत्या एका वर्षाच्या आत पुनर्विकासाचे प्रत्यक्ष काम सुरू होईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
