शिवसेना शहरप्रमुख सचिन राम पाटील यांचे पोलिसांना निवेदन
दिवा \ आरती परब : शहरातील वाढती लोकसंख्या, बाहेरून येणारी गुन्हेगारी प्रवृत्ती आणि अलीकडील दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर दिवा शहरातील कायदा- सुव्यवस्था अधिक कठोर करावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) दिवा शहरप्रमुख सचिन राम पाटील यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक, दिवा पोलीस चौकी यांना लेखी निवेदन दिले आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, दिवा शहरातील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून मुंबई व इतर भागांतून गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक शहरात येत आहेत. अलीकडे गणेश पाडा परिसरात घडलेल्या दुर्दैवी घटनेत एका निष्पाप मुलाचा मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर दिवा शहरातील सर्व सार्वजनिक ठिकाणी, शाळा, महाविद्यालये व मंदिरे येथे पोलीस गस्त वाढवावी, तसेच दिनांक ०१/१२/२०२५ रोजी झालेल्या घटनेतील आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. शहरात पुन्हा अशा घटना घडू नयेत, यासाठी पोलीस प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, असे आवाहनही यावेळी सचिन पाटील यांनी केले. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिस विभागाने सकारात्मक पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
