महानगरपालिका प्रशासनाकडे लेखी तक्रार
दिवा \ आरती परब : दिवा शहरातील प्रारूप मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात विसंगती, दुबार नावे, मृत मतदारांची नोंद, चुकीची प्रभागवारी तसेच लाभार्थी मतदारांची नावे वगळली गेल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्याने दिवा शहरात संतापाचे वातावरण आहे. यासंदर्भात दिवा शहर प्रमुख सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाकडे लेखी निवेदन देण्यात आले.
सदर निवेदन ठाणे महानगरपालिका दिवा विभाग समिती व सहाय्यक आयुक्त यांच्याकडे सादर करण्यात आले. या निवेदनात वॉर्ड क्रमांक २७ मध्ये ४७७५ दुबार नावे, वॉर्ड क्रमांक २८ मध्ये ५२५७ दुबार नावे आणि वॉर्ड क्रमांक २९ मध्ये २३६१ दुबार नावे आढळल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
तसेच वॉर्ड क्रमांक २८ मध्ये वॉर्ड क्रमांक २७ (जुना विभाग) व वॉर्ड क्रमांक २९ मधील ४६ नावांची यादी चुकीच्या पद्धतीने समाविष्ट झाल्याचे नमूद करून ही नावे तात्काळ संबंधित प्रभागात वर्ग करावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात पुढे असेही नमूद करण्यात आले आहे की प्रारूप मतदार यादीत मृत मतदारांची नोंद कायम असून, बीएलएमार्फत केलेल्या सर्वेक्षणानंतरही ही नावे हटवण्यात आलेली नाहीत. तसेच काही स्थानिक लोकप्रतिनिधींच्या संगनमताने नावांमध्ये फेरफार व फेरवाटप केल्याचा संशय व्यक्त करून सर्व नावांची काटेकोर छाननी करूनच अंतिम यादी प्रसिद्ध करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या वेळी विधानसभा प्रमुख ॲड. रोहिदास मुंडे, भाजप अध्यक्ष सचिन भोईर, मनसे विभाग अध्यक्ष प्रकाश पाटील, भाजप उपाध्यक्ष विजय भोईर, महिला विधानसभा संघटिका योगिता नाईक, युवासेना अधिकारी अभिषेक ठाकूर, उपशहर प्रमुख मारुती पडळकर, विभाग प्रमुख चेतन पाटील, तसेच योगेश निकम, संजय जाधव, प्रिया भोईर, सुयोग राणे, अजित माने, गणेश फोपाळे, राजनंदा देसाई, पूजा आग्रहरी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या तक्रारींवर तत्काळ कार्यवाही न झाल्यास संबंधित पक्षांकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
