जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांसाठी एक खिडकी योजना लागू

 


सिंधुदुर्ग प्रशासकीय यंत्रणा सज्ज

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली असून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तसेच इच्छुक उमेदवारांना आवश्यक मार्गदर्शन मिळावे यासाठी ‘एक खिडकी योजना’ लागू करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी तृप्ती जोडमिसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जिल्ह्यातील आठ तालुक्यांसाठी आठ निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करण्यात आले असून प्रत्येकी दोन याप्रमाणे एकूण १६ सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नेमण्यात आले आहेत. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने आवश्यक त्या सर्व तयारीला गती दिली असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात १४ हजार १५३ दुबार मतदार असून त्यांनी कोणत्या ठिकाणी मतदान करायचे आहे, याबाबतचे ‘ऑप्शन’ भरून घेतले जात आहेत, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे ५० सदस्य आणि पंचायत समितीचे १०० सदस्य निवडून दिले जाणार असून एकूण ५ लाख ९९ हजार ५६४ मतदार निश्चित झाले आहेत. यामध्ये महिला मतदारांची संख्या अधिक असून ३ लाख १ हजार ९०३ महिला मतदार आहेत, तर पुरुष मतदारांची संख्या २ लाख ९७ हजार ६६० इतकी आहे.

दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्हा गोवा राज्याच्या सीमेलगत असल्याने निवडणूक काळात अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी कडक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. दोडामार्ग, सावंतवाडी व वेंगुर्ला तालुक्यांमध्ये एकूण १० ठिकाणी तपासणी नाके उभारण्यात आले असून जिल्हाभर प्रतिबंधात्मक कारवाई सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर यांनी दिली.

जिल्ह्यात एकूण ८७० मतदान केंद्रे असून कुडाळ तालुक्यात सर्वाधिक १५३, तर सावंतवाडी तालुक्यात १४३ मतदान केंद्रे आहेत. निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी सुमारे ४,५०० कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील ६५ मतदान केंद्रांमध्ये नेटवर्क सुविधा नसल्याने त्या ठिकाणी अतिरिक्त व्यवस्था करण्यात येत असल्याचेही जिल्हाधिकारी जोडमिसे यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post