१५० हून अधिक एनएसएस विद्यार्थ्यांकडून ९०० कि.ग्रॅ.पेक्षा अधिक कचऱ्याचे संकलन
नवी मुंबई : स्वच्छ भारत मिशनच्या वतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ‘स्वच्छ सवयींमधून स्वच्छ भारत’ (स्वच्छ आदत से स्वच्छ भारत) हा उपक्रम राबविण्यात येत असून, त्याअंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बेलापूर येथील पारसिक हिल परिसरात विशेष स्वच्छता मोहीम यशस्वीरीत्या राबविण्यात आली.
या मोहिमेत नवी मुंबईतील सहा महाविद्यालयांच्या एनएसएस युनिटमधील युवक-युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले. सुमारे १५० हून अधिक विद्यार्थ्यांनी ९०० कि.ग्रॅ.पेक्षा अधिक कचरा संकलित करून टेकडी परिसर स्वच्छ केला.
यावेळी विद्यार्थ्यांना संबोधित करताना अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांनी ‘स्वच्छ आदत से स्वच्छ भारत’ या उपक्रमाचे महत्त्व स्पष्ट केले. प्रत्येक नागरिकाने स्वच्छतेच्या दृष्टीने सात सवयी अंगीकाराव्यात, असे आवाहन त्यांनी केले. त्यामध्ये रस्त्यावर कचरा न टाकणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, ओला-सुका कचरा घरातूनच वेगळा करणे, सिंगल यूज प्लास्टिकचा वापर टाळणे, नियमित हात धुणे, ‘थ्री आर’ – Reduce, Reuse, Recycle या संकल्पनेचा अवलंब करणे तसेच स्वच्छतागृहांचा वापर करून ती स्वच्छ ठेवणे या सवयींचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.
कोणतीही सवय लागण्यासाठी सातत्य आवश्यक असून, सामाजिक जबाबदारी म्हणून प्रत्येक नागरिकाने या उपक्रमात सहभागी व्हावे, असेही त्यांनी नमूद केले. शहर स्वच्छतेला बाधा आणणारी कृती कोणी करताना दिसल्यास त्याला योग्य शब्दांत प्रतिबंध करावा आणि स्वच्छतेच्या मोहिमेत योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
या मोहिमेत सहभागी एसआयईएस महाविद्यालय नेरूळ, एमजीएम महाविद्यालय कामोठे, स्टर्लिंग कॉलेज ऑफ फार्मसी नेरूळ, दत्ता मेघे इंजिनिअरिंग कॉलेज ऐरोली, एफ.जी. नाईक महाविद्यालय कोपरखैरणे व एस.के. कॉलेज नेरूळ या सहा महाविद्यालयांच्या एनएसएस विद्यार्थ्यांचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांनी विशेष कौतुक केले.
यावेळी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. अजय गडदे यांच्या उपस्थितीत स्वच्छतेची सामूहिक शपथ घेण्यात आली. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी स्वच्छता अधिकारी नरेश अंधेर, स्वच्छता निरीक्षक विजय नाईक, संजय पाटील, महेश मोरे तसेच स्वच्छताकर्मी यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
