‘स्वच्छ सवयींमधून स्वच्छ भारत’ अभियानांतर्गत अभिनव उपक्रम
नवी मुंबई : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिका व प्रोजेक्ट मुंबई यांच्या संयुक्त उपक्रमातून संकलित सिंगल यूज प्लास्टिकवर पुनर्प्रक्रिया करून तयार केलेल्या बेंचेसचे वितरण महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या हस्ते महानगरपालिका क्षेत्रातील शाळांना प्रातिनिधिक स्वरूपात करण्यात आले.
या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुनील पवार व डॉ. राहुल गेठे, प्रशासन विभागाचे उपआयुक्त किसनराव पलांडे, शहर अभियंता शिरीष आरदवाड, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सत्यवान उबाळे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. अजय गडदे, शिक्षण विभागाच्या उपआयुक्त संघरत्ना खिल्लारे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत जवादे, अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे, उद्यान विभाग उपआयुक्त स्मिता काळे तसेच अन्य विभागप्रमुख उपस्थित होते.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने प्लास्टिक पिशव्या व सिंगल यूज प्लास्टिकचा वापर थांबवून कापडी पिशव्यांचा वापर वाढविण्यासाठी व्यापक जनजागृती सुरू असून, ‘थ्री आर’ संकल्पनेअंतर्गत प्लास्टिक संकलन, पुनर्प्रक्रिया व पुनर्वापरावर भर दिला जात आहे. यासाठी पर्यावरणविषयक कार्य करणाऱ्या ‘प्रोजेक्ट मुंबई’ संस्थेशी सामंजस्य करार करण्यात आला असून ‘प्लास्टिकमुक्त नवी मुंबई’ संकल्पना साकारण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमांतर्गत आतापर्यंत सुमारे ४ टन प्लास्टिक संकलित करून त्याचा पुनर्वापर करण्यात आला आहे. जनजागृती उपक्रमांद्वारे ४७ हजारांहून अधिक विद्यार्थी व नागरिकांपर्यंत पोहोचण्यात आले असून ५१ शाळांचा सहभाग लाभला आहे.
माइंडस्पेस आरआयटी यांच्या सहकार्याने सातत्याने सहभागी होणाऱ्या २५ शाळा, ४ सोसायट्या, ४ स्वयंसेवी संस्था व २ कॉर्पोरेट कार्यालयांना पहिल्या टप्प्यात ३५ गार्डन बेंचेस वितरित करण्यात येत आहेत. त्यातील काही बेंचेस प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून नमुंमपा शाळा क्र. ०२ दिवाळेगाव, नमुंमपा शाळा क्र. ११७ दिवाळे, नमुंमपा शाळा क्र. १० नेरूळगाव, एमईएस विद्यामंदीर बेलापूर, विद्याभवन शाळा सेक्टर १८ नेरूळ व ज्ञानदीप सेवा मंडळ शाळा करावेगाव या सहा शाळांना प्रातिनिधिक स्वरूपात देण्यात आले. विशेष म्हणजे या पुनर्प्रक्रियाकृत बेंचेस विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी आकर्षक रंग व चित्रांनी सजविल्या आहेत.


