खाऊचे पैसे सैनिकांच्या कुटुंबासाठी



जिल्हा परिषद शाळा कालवारच्या विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम

ठाणे :  भिवंडी तालुक्यातील केंद्र राहनाळ अंतर्गत असलेल्या जिल्हा परिषद शाळा कालवार येथील इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी “खाऊचे पैसे सैनिकांच्या कुटुंबासाठी” हा आगळा-वेगळा आणि प्रेरणादायी उपक्रम राबवून समाजासमोर राष्ट्रप्रेमाचे जिवंत उदाहरण सादर केले आहे. देशाच्या संरक्षणासाठी अहोरात्र सीमेवर तैनात असलेल्या भारतीय जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला.

या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी जमा केलेली एकूण रक्कम रुपये ११,१७०/- ही दि. २० जानेवारी रोजी ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या कार्यालयामार्फत सैनिक कल्याण निधी कार्यालयात जमा करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष कौतुक केले.

शाळेच्या परिपाठादरम्यान शिक्षक प्रशांत भोसले यांनी ही संकल्पना मांडली. त्यास संपूर्ण शिक्षकवृंदाने सकारात्मक प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांना भारतीय जवानांचे जीवन, त्याग, सीमेवरील हालअपेष्टा आणि कठीण प्रसंग यांची माहिती चित्रफीत व कथनाच्या माध्यमातून देण्यात आली. यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात सैनिकांप्रती आदर, कृतज्ञता आणि आपुलकीची भावना अधिक दृढ झाली.

शाळेच्या मुख्याध्यापिका अनिला काबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेत मूल्यशिक्षणावर आधारित विविध उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत. या उपक्रमात शाळा व्यवस्थापन समिती कालवार यांचाही सक्रिय सहभाग लाभला. “आपण रोज आवडीचे पदार्थ खातो, मात्र आपले सैनिक अनेकदा अर्धपोटी राहून देशाचे रक्षण करतात,” ही जाणीव विद्यार्थ्यांच्या मनात रुजताच त्यांनी आपला खाऊचा पैसा गल्ल्यात जमा करण्यास सुरुवात केली.

या उपक्रमाची माहिती पालकांना मिळताच त्यांनीही स्वतः शाळेत येऊन शक्य तितकी आर्थिक मदत गल्ल्यात जमा केली. त्यामुळे उपक्रमाला अधिक बळ मिळाले. तसेच गावकऱ्यांकडूनही या उपक्रमास भरभरून शुभेच्छा आणि प्रतिसाद मिळाला.

दरम्यान, गणेशोत्सव काळात शासनाच्या सूचनेनुसार शिक्षणाचा प्रसार व प्रचार व्हावा, या उद्देशाने इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये जाऊन गवळण व साक्षरता गीतांचे सादरीकरण केले. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाने प्रभावित होऊन ग्रामस्थांनी आरतीच्या ताटात शुभेच्छारूपी दान दिले. ही संपूर्ण रक्कमही सैनिक निधीसाठीच्या गल्ल्यात जमा करण्यात आली.

जिल्हा परिषद शाळा कालवारच्या चिमुकल्यांनी राबविलेला हा उपक्रम केवळ आर्थिक मदतीपुरता मर्यादित न राहता, समाजात राष्ट्रप्रेम, त्याग व कृतज्ञतेची मूल्ये रुजविणारा ठरला असून, इतर शाळांसाठीही तो निश्चितच प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.


Post a Comment

Previous Post Next Post