ठाणे : शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवक व नगरसेविकांची बैठक ठाण्यातील आनंदाश्रम (आनंदमठ) येथे उत्साहात पार पडली. या बैठकीत शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार नगरसेवक पवन कदम यांची ठाणे महानगरपालिकेच्या शिवसेना गटनेतेपदी निवड करण्यात आली. यानिमित्त त्यांचा सर्व उपस्थितांनी मनःपूर्वक अभिनंदन व सत्कार केला.
या बैठकीस खासदार नरेश म्हस्के, माजी आमदार रविंद्र फाटक, ठाणे जिल्हा महिला संघटक मीनाक्षी शिंदे तसेच पक्षाचे इतर पदाधिकारी व नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ठाणे महानगरपालिकेत शिवसेनेच्यावतीने निवडून आलेल्या सर्व ७५ नगरसेवकांचे यावेळी अभिनंदन करण्यात आले. या घवघवीत यशाचे संपूर्ण श्रेय शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देत, त्यांच्या अभिनंदनाचा ठराव खासदार नरेश म्हस्के यांनी मांडला. उपस्थित सर्व नगरसेवकांनी टाळ्यांच्या गजरात या ठरावाला संमती दिली.
याच बैठकीत माजी गटनेते दिलीप बारटक्के यांनी यापूर्वी पार पाडलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत त्यांचाही सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. बैठक अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडली. आगामी काळात ठाणे महानगरपालिकेत शिवसेना जनतेच्या हितासाठी अधिक जोमाने काम करेल, असा दृढ विश्वास यावेळी सर्वांनी व्यक्त केला.


