महिलेचा जागीच मृत्यू, लहान मुलगा बचावला
डोंबिवली \ शंकर जाधव: डोंबिवली पश्चिमेकडील महाराष्ट्रनगर परिसरातील गोपीनाथ चौकात गुरुवारी दुपारी सुमारे एक वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील एका महिलेचा मृत्यू झाला, तर तिच्यासोबत असलेला लहान मुलगा थोडक्यात बचावल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला आपल्या दुचाकीवरून लहान मुलासह जात असताना मागून येणाऱ्या डंपरचा धक्का बसला. धक्क्यामुळे दुचाकीचा तोल जाऊन महिला रस्त्यावर पडली. यावेळी डंपरच्या मागील चाकाखाली आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीवरील लहान मुलगा मात्र सुदैवाने गंभीर अपघातातून बचावला असून त्याला किरकोळ दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे.
अपघातानंतर परिसरात मोठी गर्दी झाली होती. स्थानिक नागरिकांनी तात्काळ पोलिसांना व रुग्णवाहिकेला माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. जखमी मुलाला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, गोपीनाथ चौकात वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे वाहतूक नियंत्रण आणि जड वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. संबंधित डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
