‘दिवा-सीएसटी' लोकल सुरू करणार
खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांचे प्रतिपादन
दिवा \ आरती परब : “दिवेकर शिवसेना - महायुतीच्या नेहमीच पाठीशी भक्कमपणे उभे आहेत. गेल्या दहा वर्षांत जे काम करण्याचे वचन दिले ते पूर्ण केले आहे. दिवा शहराचा कायापालट करून, तुम्हाला सुरक्षित आणि स्वच्छ वातावरण देण्याचा आमचा निर्धार पक्का आहे. भविष्यात दिवा ते सीएसटी लोकल सुरू होईल, ज्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. याशिवाय, दिव्यातील विविध विकासकामे सुरू असून, दर्जेदार शिक्षण, आरोग्य सुविधा आणि रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. काम करणारा पक्ष आणि काम करणारे सरकार हे शिवसेना महायुतीचेच आहेत, त्यामुळे पुढील काळात दिवा शहराचा अधिक आणि वेगाने विकास होईल, असे खासदार डॉ. श्रीकांत शिंदेने प्रतिपादन केले. ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत दिव्यातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.
ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिवा येथे शिवसेना- भाजप महायुतीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा पार पडली. या सभेला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. यावेळी डॉ.श्रीकांत शिंदे यांनी दिव्याच्या कायापालटाचा उल्लेख करत आगामी काळात 'दिवा ते सीएसटी' विशेष लोकल सुरू करण्याचे आश्वासन दिले. यावेळी दिवा शहरात गेल्या दहा वर्षांत झालेल्या आणि सध्या सुरू असलेल्या विकासकामांचा सविस्तर आढावा देण्यात आला. दिवा- शीळ मार्गाचे काँक्रीटीकरण, दिवा रेल्वे स्थानकाचा सर्वांगीण विकास, प्रवाशांसाठी वाढविण्यात आलेल्या सुविधा, बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत दिवा येथील स्थानकाचे सुरू असलेले काम, क्लस्टर पुनर्विकास योजना, भुयारी गटारी योजना, आगरी कोळी वारकरी भवन, नानासाहेब धर्माधिकारी सभागृह, अंतर्गत रस्त्यांचे काँक्रीटीकरण, महापालिकेच्या शाळांचा विकास, प्रशस्त पोलिस स्टेशन, डम्पिंग ग्राउंड हटविण्याचा निर्णय आणि आरोग्य सुविधांमधील सुधारणा यांचा उल्लेख यावेळी करण्यात आला.
दिवा शहराचा बदल अधोरेखित करताना खासदार डॉ. शिंदे म्हणाले की, “दहा वर्षांपूर्वी दिवा केवळ गाव स्वरूपात होता. रस्ते, पाणी, स्वच्छता आणि रेल्वे स्थानकाची परिस्थिती अत्यंत बिकट होती. एका प्लॅटफॉर्मवरून प्रवाशांना जीव धोक्यात घालून उतरावे लागायचे. आज दिवा स्थानकाचा कायापालट झाला असून सुरक्षितता आणि सुविधा मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.” दिवा शहरात मोठ्या गृहसंकुलांचा विस्तार होत असून, वाढती लोकसंख्या लक्षात घेता दर्जेदार शाळा, महाविद्यालये, रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालयाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. अंबरनाथ येथे मंजूर करण्यात आलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाचे उदाहरण देत, भविष्यात दिवा शहरातही असे प्रकल्प उभारले जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. रेल्वे सुविधांबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, दिवा स्थानकावर फास्ट व लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा, प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण आणि तिकीट खिडक्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. भविष्यात कोकणात जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्याही दिव्यात थांबतील, तसेच दिवा - सीएसटी विशेष लोकल सुरू होणार असल्याने प्रवाशांचा प्रवासाचा त्रास मोठ्या प्रमाणात कमी होईल. युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी कल्याण रोड परिसरात टाटा स्किल सेंटर उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, पुढील सहा ते सात महिन्यांत ते सुरू होणार आहे. भविष्यात दिवा शहरात उद्योजक घडवण्यासाठी विशेष प्रशिक्षण केंद्र उभारण्याचाही मानस असल्याचे त्यांनी सांगितले.
दिवा शहरात आगरी कोळी वारकरी भवन, नानासाहेब धर्माधिकारी सभागृह, छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा, अग्निशमन केंद्र, पोलिस स्टेशन, तलाव सुशोभीकरण, परिवहन सेवा आणि महापालिकेच्या शाळा उभारण्यात आल्याची माहिती देण्यात आली. कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी बायोमायनिंग प्रकल्प मंजूर झाल्याने, भविष्यात डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न पूर्णतः सुटणार असल्याचेही सांगण्यात आले.
दिवा येथील प्रभाग क्रमांक २७ चे शिवसेना - भाजपा महायुतीचे नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार शैलेश पाटील, आदेश भगत, दिपाली भगत, स्नेहा पाटील, प्रभाग क्रमांक २८ मधील रमाकांत मढवी, साक्षी मढवी, दीपक जाधव, दर्शना म्हात्रे तसेच प्रभाग क्रमांक २९ चे अधिकृत उमेदवार बाबाजी पाटील, अर्चना पाटील आणि वेदिका पाटील यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा पार पडली. यावेळी विविध सामाजिक संघटनांनी शिवसेना - महायुतीला जाहीर पाठिंबा दिला.
सभेच्या शेवटी १५ जानेवारी रोजी धनुष्यबाण आणि कमळ चिन्हासमोरील बटन दाबून महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी केले. “काम करणारा पक्ष आणि काम करणारे सरकार हे महायुतीचेच आहे. पुढील काळात दिवा शहरात आणखी मोठ्या प्रमाणावर विकासकामे होतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
क्लस्टर पुनर्विकास योजनेचे सर्वेक्षण ९५% पूर्ण
क्लस्टर पुनर्विकास योजनेबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, “ही योजना म्हणजे केवळ घर नव्हे, तर सर्वांगीण विकास आहे. धोकादायक आणि अनधिकृत इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना हक्काचे, अधिकृत आणि मोठे घर विनामूल्य मिळणार आहे. ठाणे शहरात एकाचवेळी १३ क्लस्टर प्रकल्प सुरू आहेत. दिवा शहरातही ९५ टक्के सर्वे पूर्ण झाला असून, लवकरच प्रत्यक्ष काम सुरू होईल.”
आम्ही दहा वर्षांत दिलेला शब्द पाळला - खासदार डॉ.श्रीकांत शिंदे
प्रत्येक निवडणुकीत राजकीय पक्ष लोकांसमोर येतात. मुंबईच उदाहरणं, आज मराठीच्या नावावर एकत्र आलेले आहेत, पण २५ वर्षांत काय केलं ते त्यांनी सांगितलेलं नाही. उलट पुढे काय करणार ते सांगण्यासाठी लोकांच्या समोर जात आहेत. पण आम्ही १० वर्षांत दिलेला शब्द पाळला आहे, हे अभिमानाने सांगतो” अशा शब्दांत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटावर निशाणा साधला.

