जि.प. व प.स. निवडणुकीसाठी महायुतीचे जागावाटप निश्चित


सिंधुदुर्गात उमेदवार निवडीचे सर्वाधिकार खासदार नारायण राणेंकडे

कणकवली : आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकारणाला आज स्पष्ट दिशा मिळाली. भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांची महायुती या निवडणुका एकत्र लढवणार असून, जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला जाहीर करण्यात आला आहे. या निवडणुकांसाठी उमेदवार ठरवण्याचे सर्वाधिकार भाजपाचे खासदार नारायण राणे यांच्याकडे सोपवण्यात आले आहेत.

कणकवली येथील ‘ओम गणेश’ निवासस्थानी आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत खासदार नारायण राणे यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली. महायुतीतील तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत जागावाटपावर एकमत झाले असून त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.


जिल्हा परिषद व पंचायत समिती जागावाटप

जिल्हा परिषद (५० जागा) – भाजप ३१, शिवसेना (शिंदे गट) १९

पंचायत समिती (१०० जागा) – भाजप ६३, शिवसेना ३७

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) इच्छुक असल्यास भाजप व शिवसेनेकडून समन्वयाने काही जागा देण्यात येतील, असेही राणे यांनी स्पष्ट केले.

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ 

भाजप : जि.प. ११, प.स. १७

शिवसेना : जि.प. ६, प.स. १७

कुडाळ–मालवण विधानसभा मतदारसंघ 

भाजप : जि.प. ४, प.स. १७

शिवसेना : जि.प. ११, प.स. १५

कणकवली विधानसभा मतदारसंघ 

भाजप : जि.प. १६, प.स. ३१

शिवसेना : जि.प. २, प.स. ५

“महायुतीचा विजय निश्चित” 

या निवडणुकांत महायुतीला शंभर टक्के यश मिळेल, असा विश्वास खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केला. महानगरपालिका निवडणुकांप्रमाणेच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांतही महायुतीचाच विजय होईल, असा दावा त्यांनी केला. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडेल, विरोधकांकडे प्रभावी लढत देण्याची ताकद उरलेली नाही, असेही त्यांनी नमूद केले. सोमवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार असून, सर्व जागांवर सक्षम व ताकदवान उमेदवार देण्याचा निर्धार महायुतीने केला आहे, असे त्यांनी सांगितले.


यावेळी पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, शिवसेना उपनेते संजय आंग्रे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, सचिन वालावलकर यांच्यासह महायुतीतील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यातही महायुतीचा निर्णय झाल्याची माहिती खासदार नारायण राणे यांनी यावेळी दिली.




Post a Comment

Previous Post Next Post