दिवा रेल्वे स्थानकातील पूर्वेकडील तिकीटघर रात्री १२ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मागणी

 



दिवा \ आरती परब  : दिवा रेल्वे स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून दिवा शहराची सुमारे ९० टक्क्यांहून अधिक लोकवस्ती ही दिवा पूर्व परिसरात आहे. मात्र सध्या दिवा रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील एकमेव तिकीटघर रात्री ९ वाजता बंद होत असल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.


याबाबत दिवा रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक, मुंबई यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे. यापूर्वी दिवा स्थानकाच्या पूर्वेला तिकीटघरच नसताना संघटनेने सातत्याने पाठपुरावा केला होता. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून दिवा स्थानकाच्या पूर्वेला नवीन तिकीटघर सुरू झाले असून त्यामुळे असंख्य प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.


सध्या दिवा स्थानकाच्या पूर्वेकडील डोंबिवली दिशेला असलेले हे एकमेव तिकीटघर प्रवाशांच्या प्रचंड गर्दीमुळे ताणाखाली आहे. पादचारी पुलावर तिकीट व्हेंडिंग मशीनची संख्या अपुरी असल्याने बहुतांश प्रवाशांना पूर्वेकडील तिकीटघरावरच अवलंबून राहावे लागते. मात्र रात्री ९ नंतर हे तिकीटघर बंद झाल्यावर प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी दिवा पश्चिमेकडे जावे लागते.


दिवा पश्चिमेचे तिकीटघर मुंबई दिशेला असल्याने प्रवाशांना मोठी पायपीट करावी लागते. याचा विशेषतः रात्रीच्या वेळेस महिला प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर दिवेकर रेल्वे प्रवाशांच्या वतीने दिवा रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील तिकीटघर रात्री ९ नंतर किमान रात्री १२ वाजेपर्यंत सुरू ठेवावे, अशी ठाम मागणी दिवा रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष ॲड. आदेश भगत यांनी मध्य रेल्वेकडे केली आहे. प्रवाशांची दैनंदिन गैरसोय लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post