दिवा / आरती परब : देशाच्या प्रजासत्ताक दिनाच्या औचित्यावर ग्लोबल इंग्लिश स्कूलमध्ये मोठ्या उत्साहात ७७ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे चेअरमन महेंद्र दळवी होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे मुंब्रा पोलिस ठाण्याचे ए. पी.आय वसंत खतेले, ए. पी.आय. अमोल कोळेकर आणि ए. पी.आय राजेंद्र तोरडमल यांच्या हस्ते ध्वजारोहण करून करण्यात आली.
ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत व प्रतिज्ञा घेण्यात आली. यावेळी शाळेच्या प्राचार्या श्रीमती ज्योत्स्ना सोनी, किरण सावंत सर, शिक्षकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, समूहगायन, नृत्य, कवितावाचन व प्रभावी भाषणे सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणामुळे संपूर्ण परिसर देशभक्तीमय व प्रेरणादायी वातावरणाने भारावून गेला.
याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणातून भारतीय संविधानाचे महत्त्व, नागरिकांचे हक्क व कर्तव्ये, शिस्त, एकता व बंधुता याविषयी मार्गदर्शन केले. तरुण पिढीने व्यसनांपासून दूर राहून शिक्षण, शिस्त व देशसेवेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी चेअरमन महेंद्र दळवी यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रप्रेम, नैतिक मूल्ये व सामाजिक जबाबदारी यांचे महत्त्व सांगून शाळा नेहमीच सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे नमूद केले. कार्यक्रमाच्या शेवटी प्राचार्या श्रीमती ज्योत्स्ना सोनी यांनी सर्व मान्यवरांचे, पालकांचे व उपस्थितांचे आभार मानले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे व शिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनामुळे हा कार्यक्रम अत्यंत यशस्वीपणे पार पडल्याचे त्यांनी सांगितले.
