‘गाव तिथे एसटी’ नव्हे; ‘आदिवासी पाडा, तिथे एसटी’!

 


मुंबई :  महाराष्ट्रातील सह्याद्री आणि मेळघाटच्या दुर्गम आदिवासी पाड्यांपर्यंत आता थेट एसटी सेवा पोहोचणार आहे. राज्याचे परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी आज ऐतिहासिक घोषणा करत सांगितले, “आता केवळ गाव तिथे एसटी नाही, तर आदिवासी पाडा तिथे एसटी.”

पुण्यश्लोक अहिल्यादेवी’ मिडी बसेस 

राज्य परिवहन महामंडळाने ९ मीटर लांबीच्या, ३५ आसनी अशा १०० अत्याधुनिक मिडी बसेस खरेदी केल्या आहेत. या बसेस ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी’ असे प्रेरणादायी नामकरण करण्यात येणार आहे. अरुंद रस्ते, तीव्र चढ-उतार आणि घाटरस्त्यांवरून सहज धावू शकणाऱ्या या बसेस आदिवासी पाड्यांसाठी खास नियोजित आहेत.

स्वातंत्र्यानंतरच्या ८ दशकांत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात एसटी पोहोचली; आज ९३% लोकसंख्या एसटी सेवेशी जोडलेली आहे. तरीही सह्याद्री आणि मेळघाटच्या दऱ्यांतील अनेक पाडे विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर होते. मोठ्या बसेस तिथे जाऊ शकत नसल्यामुळे आदिवासी बांधवांना शिक्षण, आरोग्य आणि रोजगारासाठी अनेक किलोमीटर चालावे लागत होते. आता ही पायपीट थांबणार आहे.

ही फक्त बससेवा नाही, तर सामाजिक समावेशकतेचा सेतू आहे. शहरातील शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, आरोग्यसेवेसाठी धाव घेणाऱ्या मातांसाठी आणि रोजगाराच्या शोधात निघालेल्या तरुणांसाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी’ बस आशेचा किरण ठरणार आहे.

मंत्री सरनाईक म्हणाले, “दुर्गम भागातील आदिवासी समाज आता एसटीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राशी जोडला जाईल. विकासाची गंगा प्रत्येक पाड्यापर्यंत पोहोचवण्याचा हा आमचा निर्धार आहे.”

विकासाचा नवा संकल्प

‘लालपरी’च्या चाकांमध्ये आता केवळ प्रवास नाही, तर परिवर्तनाची गती दडलेली आहे. लवकरच डोंगर-दऱ्यांतील शांत पाड्यांवर एसटीचा हॉर्न वाजेल आणि त्या आवाजात विकास, समता आणि संधींची नवी पहाट उजळणार असल्याची माहिती अभिजीत भोसले, जनसंपर्क अधिकारी, मंत्री परिवहन यांनी दिली.


Post a Comment

Previous Post Next Post