ठाणे : ठाणे महानगरपालिका आणि प्राणी मित्र संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे शहरात विशेष ‘रेबीज मुक्त ठाणे’ मोहिमेचे शुभारंभ महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला. महापौर दालनात या मोहिमेचे उद्घाटन व फलकाचे अनावरण करण्यात आले.
या मोहिमेसाठी ५० जणांचे विशेष लसीकरण पथक तयार करण्यात आले असून, केवळ ७ दिवसांत ५,००० भटक्या कुत्र्यांचे रेबीज लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. तसेच येत्या महिनाभरात तब्बल २५,००० भटक्या कुत्र्यांचे लसीकरण करण्याचे नियोजन आहे.
लसीकरण झालेल्या कुत्र्यांच्या गळ्यात केशरी रंगाचा रिफ्लेक्टर पट्टा बांधला जाईल, ज्यामुळे नागरिकांना हे कुत्रे सहज ओळखता येतील.
महापौर पिंपळोलकर यांनी नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले, कारण ही मोहीम शहरातील आरोग्य आणि रेबीजसारख्या प्राणघातक आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.


