आनंद आश्रमात पुन्हा 'जनसंवाद'



ठाणेकरांच्या तक्रारींसाठी जनता दरबार सज्ज

ठाणे : सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न थेट ऐकून त्यांचे तात्काळ निराकरण करण्यासाठी आनंद आश्रम येथे जनसंवाद उपक्रम पुन्हा सुरू करण्यात येत आहे. प्रत्येक मंगळवार आणि गुरुवार या दिवशी हा जनता दरबार भरवण्यात येणार असून ठाणेकरांनी आपल्या समस्या येथे मांडाव्यात, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


ठाणे महापालिकेच्या निवडणुकांनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी महापौर अशोक वैती, ज्येष्ठ नगरसेवक मनोज शिंदे आणि माजी नगरसेवक राजेंद्र साठे यांच्या पुढाकारातून या जनसंवादाला पुन्हा प्रारंभ होत आहे. शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी सुरू केलेली सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठीची थेट संवादाची परंपरा पुढे चालू ठेवण्याचा हा प्रयत्न मानला जात आहे.


पूर्वी आयोजित करण्यात आलेल्या जनसंवाद उपक्रमाला ठाणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. अनेक नागरिकांच्या स्थानिक पातळीवरील समस्या, प्रशासकीय अडचणी आणि नागरी सुविधांबाबतच्या तक्रारी या माध्यमातून मार्गी लागल्या होत्या. मात्र महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही काळ हा उपक्रम स्थगित ठेवण्यात आला होता. आता नागरिकांच्या मागणीनुसार तो पुन्हा सुरू करण्यात येत आहे.


येत्या मंगळवारी दुपारी १२ ते २ या वेळेत, टेभी नाका येथील आनंद आश्रमात पहिला जनसंवाद होणार आहे. यावेळी अशोक वैती, राजेंद्र साठे आणि मनोज शिंदे हे उपस्थित राहून नागरिकांच्या समस्या ऐकणार आहेत. या उपक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन माजी महापौर अशोक वैती, ज्येष्ठ नगरसेवक मनोज शिंदे, माजी नगरसेवक जनार्दन खेतले, ॲड. प्रियांका शिंगारे आणि रतन अवसरमोल यांनी केले आहे. ठाणेकरांच्या दैनंदिन नागरी अडचणींना त्वरित दिलासा देण्याच्या दृष्टीने हा जनसंवाद उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.



Post a Comment

Previous Post Next Post