रमजान महिन्यात वीजपुरवठा खंडित होऊ नये



झफर नोमानी यांची टोरंट पॉवरकडे मागणी

मुंब्रा \ आरती परब : रमजान या मुस्लिम समाजासाठी अत्यंत पवित्र असलेल्या महिन्यात कळवा, मुंब्रा, कौसा व दिवा शीळ परिसरात वीजपुरवठा खंडित होऊ नये, यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुंब्रा, कळवा विधानसभा अध्यक्ष झफर नोमानी यांनी टोरंट पॉवर लिमिटेड, शिळ– मुंब्रा– कळवा विभाग कार्यालयाकडे निवेदनाद्वारे केली आहे.


गुरुवार दि. १९ फेब्रुवारी ते शनिवार दि. २१ मार्च या कालावधीत रमजान महिना सुरू होत असून या काळात रोजा, नमाज, सेहरी व इफ्तार असे धार्मिक विधी मोठ्या प्रमाणावर पार पडतात. कळवा– मुंब्रा– कौसा परिसरात मुस्लिम समाजाची मोठी लोकवस्ती असल्याने या धार्मिक विधींसाठी अखंड वीजपुरवठा अत्यावश्यक आहे.


वीजपुरवठा खंडित झाल्यास नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे रमजान महिन्याच्या संपूर्ण कालावधीत कोणत्याही प्रकारचा नियोजित किंवा अनियोजित वीजपुरवठा खंडित होऊ नये, यासाठी आवश्यक ती खबरदारी व प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. तसेच, तांत्रिक बिघाड झाल्यास तात्काळ दुरुस्तीची प्रभावी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी विनंती झफर नोमानी यांनी केली आहे.


या मागणीमुळे रमजान काळात नागरिकांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा परिसरातील रहिवाशांनी व्यक्त केली आहे. त्यावेळी झफर नोमानी, नेहा नाईक, अश्रीन राऊत, राजू अन्सारी, रूपाली मॅम, नगरसेवक राजन किणे, रेहान पिठालवाला उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post