कोल्हापूर \ शेखर धोंगडे : ‘स्मॅक प्रीमियर लीग - २०२६’ टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ शुक्रवारी शास्त्रीनगर मैदानावर उत्साहपूर्ण आणि दिमाखदार वातावरणात झाला. उद्योग क्षेत्रातील उत्साह, एकात्मता आणि क्रीडाभावनेचा सुंदर मिलाफ यावेळी पाहायला मिळाला.
उद्घाटन समारंभ यांच्या डीवायएसपी वैष्णवी एस. पाटील व कोल्हापूरचे उपमहापौर अक्षय जरग यांच्या हस्ते पार पडला. यावेळी नगरसेविका पूजा पोवार तसेच स्पर्धेचे प्रमुख प्रायोजक टेक्नोमेट एंटरप्राईजेसचे विजय सोमानी उपस्थित होते.
कारखानदार आणि कामगार यांच्यातील सुसंवाद वृद्धिंगत व्हावा, तणावमुक्त वातावरण निर्माण व्हावे आणि सांघिक भावना बळकट व्हावी, या उद्देशाने स्मॅकच्या वतीने दरवर्षीप्रमाणे या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असल्याचे आयोजकांनी सांगितले.
यावेळी बोलताना डीवायएसपी वैष्णवी एस. पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, क्रीडा स्पर्धा या केवळ मनोरंजनाचा भाग नसून व्यक्तिमत्त्व विकासासाठी अत्यंत उपयुक्त माध्यम आहे. खेळामुळे शिस्त, वेळेचे व्यवस्थापन, नेतृत्वगुण आणि संघभावना विकसित होतात. उद्योग क्षेत्रात काम करताना येणारा ताणतणाव दूर करण्यासाठी अशा स्पर्धा महत्त्वपूर्ण ठरतात. कामगार आणि कारखानदार एकत्र खेळल्याने परस्परांतील संवाद वाढतो, गैरसमज दूर होतात आणि सकारात्मक वातावरण निर्माण होते. समाजात सुदृढ व निरोगी पिढी घडवण्यासाठी क्रीडा संस्कृती जोपासणे आवश्यक आहे, असेही त्यांनी नमूद केले.
उपमहापौर अक्षय जरग यांनी स्मॅकच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक करताना सांगितले की, उद्योग क्षेत्रातील संघटनांनी केवळ व्यावसायिक प्रगतीपुरते मर्यादित न राहता सामाजिक बांधिलकी जपणे ही काळाची गरज आहे. स्मॅकने आयोजित केलेली ही प्रीमियर लीग उद्योगजगतात एकात्मता आणि सौहार्द निर्माण करणारा स्तुत्य उपक्रम आहे. अशा स्पर्धांमुळे उद्योग परिसरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि उद्योजक व कर्मचारी यांच्यात सुसंवाद वाढीस लागतो. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी उद्योग क्षेत्राचा सहभाग महत्त्वाचा असून, स्मॅकचे हे कार्य निश्चितच इतरांसाठी आदर्श ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
स्मॅक प्रीमियर लीगचे हे चौथे पर्व असून, यंदा १२ उद्योजक संघांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला आहे. यात झंवर ग्रुप चॅम्पियन्स, सरोज वॉरियर्स, कॅस्प्रो इलेव्हन, यश टायगर्स, हिंद फायटर्स, रत्ना स्ट्रायकर्स, कोहिनूर मेटॅलिक्स, ट्रायो चॅलेंजर्स, विश्वकर्मा वॉरियर्स, पिनॅकल-राज टेक्नो युनायटेड, मिस्टेर मार्व्हल्स आणि व्ही. पी. वॉरियर्स या संघांचा समावेश आहे.
स्पर्धेतील सामने ७ षटकांचे असून अंतिम सामन्यासह एकूण १९ सामने खेळवले जाणार आहेत. सकाळी ८ वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत सामने रंगणार असून सायंकाळचे सामने प्रकाशझोतात होणार आहेत. स्मॅकचे अध्यक्ष जयदीप चौगले यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. स्पर्धेची सांगता व बक्षीस वितरण समारंभ शनिवारी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
यावेळी स्मॅकचे ऑ. सेक्रेटरी रणजीत जाधव, खजानिस बदाम पाटील, सुवर्णमहोत्सव समिती अध्यक्ष सुरेन्द्र जैन, निमंत्रित सदस्य ॲड. अशोक उपाध्ये, सचिन बुधले, शरद पाटील, भीमराव खाडे, अजिंक्य तळेकर, मोहन जाधव, रामराजे बदले, भरत सोमय्या, मॅकचे अध्यक्ष मोहन कुशिरे, कोल्हापूर चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे, कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे संचालक बाबासो कोंडेकर, उद्योजक विजय पाटील, दीपक घोंगडी, काका पाटील, संयोजन समिती सदस्य ओंकार भगत, अभिषेक सोनी, अभिषेक झंवर, श्रीराम सुरवसे, साहील मोमीन, कुणाल कट्टी, प्रेम शिंदे, धवल पाटील आदी उपस्थित होते.