कंत्राटी कामगार व वारसा हक्काचे प्रश्न मार्गी लागणार


 ठाण्यात ‘कलर म्युझियम’ला गती

ठाणे : आमदार संजय केळकर यांनी मंगळवारी ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन कंत्राटी कामगारांच्या सुविधा, किमान वेतन तसेच प्रलंबित वारसा हक्क प्रकरणांबाबत सविस्तर चर्चा केली. कंत्राटी कामगारांचे प्रश्न आणि वारसा हक्काची प्रकरणे प्राधान्याने निकाली काढण्यात येतील, असे आश्वासन आयुक्तांनी दिले. याच बैठकीत ठाण्यातील प्रस्तावित ‘कलर म्युझियम’ प्रकल्पाला गती देण्याबाबतही चर्चा झाली. ठाण्यात जागतिक दर्जाचे कलर म्युझियम उभे राहावे, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश देण्यात आल्याची माहिती आमदार केळकर यानी दिली. 

या भेटीत उपमहापौर कृष्णा पाटील, गटनेते मुकेश मोकाशी, नगरसेवक सुनेश जोशी, सीताराम राणे, विकास पाटील तसेच अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे आणि सर्व विभागांचे उपायुक्त उपस्थित होते.कंत्राटी कामगारांची संख्या मोठी असून अनेक ठिकाणी कंत्राटदारांकडून कामगारांची पिळवणूक होत असल्याचे आमदार केळकर यांनी निदर्शनास आणून दिले. नियमानुसार सुविधा व किमान वेतन न देणाऱ्या कंत्राटदारांवर कठोर कारवाई करून त्यांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी करण्यात आली.


प्रलंबित वारसा हक्क प्रकरणांची संख्याही मोठी असून ती तातडीने निकाली काढावीत, यासाठी इतर महापालिकांचे दाखले देत प्रशासनाकडे मागणी करण्यात आली. मालमत्ता विभागाच्या अनेक मालमत्तांचा गैरवापर होत असून काही ठिकाणी भाडेही नियमित वसूल होत नसल्याचे बैठकीत मांडण्यात आले. बळकावलेल्या मालमत्ता ताब्यात घेऊन संबंधितांना नोटिसा देण्यात याव्यात तसेच मालमत्ता विभागाची श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी करण्यात आली. यावर आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाहीचे निर्देश दिले.


२०१७ साली झाड पडून मृत्यू झालेल्या नागरिकाच्या पत्नीला महापालिकेत नोकरी देण्याचे प्रशासनाने दिलेले आश्वासन अद्याप पूर्ण झाले नसल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. या प्रकरणात सकारात्मक निर्णय घेऊन तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. फेरीवाला धोरणाची प्रभावी अंमलबजावणी न झाल्याने शहरातील पदपथ व रस्त्यांवर अडथळे निर्माण होत असल्याने हे धोरण तातडीने राबविण्याची मागणी करण्यात आली.


यासह मसाला गिरण्या बंद करणे, अनधिकृत बांधकामांवर कारवाई, महावितरण सबस्टेशनसाठी जागा उपलब्ध करून देणे, कौशल्य हॉस्पिटल पार्किंग शुल्क, कंत्राटी शिक्षकांचे प्रश्न, खासगी गृहसंकुलांतील झाडांची मोफत छाटणी, सुरळीत पाणीपुरवठा, नाले बांधणी व विहिरींचे पुनरुज्जीवन आदी विविध विषयांवर चर्चा करून तातडीच्या कार्यवाहीची मागणी आमदार केळकर यांनी केली.



Post a Comment

Previous Post Next Post