महिला व बालकल्याण व स्थायी समित्यांमार्फत जळगावच्या शाश्वत विकासावर भर

 


महापौर दीपमाला काळे यांची माहिती

जळगाव : जळगाव शहराच्या नियोजनबद्ध आणि दीर्घकालीन विकासासाठी महिला व बालकल्याण समिती तसेच स्थायी समिती यांच्या माध्यमातून ठोस उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती महापौर दीपमाला काळे यांनी दिली.

महानगरपालिकेच्या अलीकडील महासभेत दोन्ही समित्यांची निवड प्रक्रिया पूर्ण झाली. त्यानंतर शहराच्या भविष्यातील विकास आराखड्याबाबत भूमिका स्पष्ट करताना महापौरांनी सांगितले की, शहरातील प्रलंबित प्रश्न सोडवणे, महिला व बालकांसाठी विशेष योजना प्रभावीपणे अंमलात आणणे आणि मूलभूत सुविधांचा दर्जा उंचावणे यावर प्राधान्याने काम केले जाईल.

महिला व बालकल्याण समितीमार्फत महिलांसाठी कौशल्यविकास प्रशिक्षण, आरोग्य तपासणी शिबिरे, सुरक्षिततेसंदर्भातील उपक्रम तसेच बालकांच्या पोषण व शिक्षणविषयक सुविधा मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे. अंगणवाडी व्यवस्थेचे सक्षमीकरण आणि महिला सक्षमीकरणाच्या विविध योजना राबविण्याचा मानस व्यक्त करण्यात आला.

स्थायी समितीच्या माध्यमातून रस्ते दुरुस्ती व बांधकाम, पाणीपुरवठा सुधारणा, स्वच्छता व्यवस्थेची उभारणी तसेच अन्य पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देण्यात येणार आहे. उपलब्ध निधीचा योग्य आणि पारदर्शक वापर करून दीर्घकालीन व शाश्वत विकास साधण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

विकासकामे करताना पारदर्शकता, नियोजनशीर अंमलबजावणी आणि तांत्रिक निकषांचे पालन यावर भर दिला जाईल. महिला व बालकांचा सर्वांगीण विकास आणि मूलभूत सुविधांची उभारणी यांचा समन्वय साधत जळगाव शहर अधिक सक्षम आणि आधुनिक करण्याचा प्रयत्न राहील, असे महापौरांनी नमूद केले.

Post a Comment

Previous Post Next Post