डोंबिवली-मुंबईत बनावट औषधांचे मोठे रॅकेट उघड
दोन वितरक अटकेत; मुख्य सूत्रधारांचा शोध सुरू
डोंबिवली \ शंकर जाधव : उच्च रक्तदाबाच्या उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘Telma AM’ या औषधाच्या नावाखाली बनावट गोळ्यांचा पुरवठा करणारे रॅकेट मनपाडा पोलिसांनी उघडकीस आणले आहे. डोंबिवली व मुंबईतील दोन वितरकांना अटक करण्यात आली असून मुख्य सूत्रधारांचा शोध सुरू आहे. रुग्णांच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या या गंभीर प्रकारामुळे औषध बाजारात मोठी खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या वितरकांची नावे विवेक राय आणि पंकज उपाध्याय अशी आहेत. कल्याण-डोंबिवली परिसरात बनावट औषधांचा मोठा साठा आढळून आला. उच्च रक्तदाबासाठी डॉक्टरांच्या चिठ्ठीवर दिले जाणारे ‘Telma AM’ या औषधाच्या नावाखाली बनावट गोळ्यांची विक्री होत असल्याचे तपासात स्पष्ट झाले. या गोळ्यांवर या नामांकित कंपनीचे लेबल वापरण्यात आले होते.
कंपनीच्या प्रतिनिधींना ठाणे परिसरात त्यांच्या ब्रँड नावाने संशयास्पद औषधांची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर प्रकरणाची तक्रार (FDA) कडे करण्यात आली. एफडीएच्या प्राथमिक तपासात जप्त नमुन्यांमध्ये गंभीर तफावत आढळून आली. प्रयोगशाळा विश्लेषणात या गोळ्या अपेक्षित वेळेपेक्षा उशिरा विरघळत असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे औषधाचा परिणाम उशिरा होऊन रुग्णांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली.
एफडीए निरीक्षक राजश्री शिंदे यांच्या कारवाईत डोंबिवलीतील ‘श्री राम फार्मा’ या वितरकाकडून १,००० पट्ट्या जप्त करण्यात आल्या. नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आल्यानंतर त्या बनावट असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर एफडीएने मनपाडा पोलीस ठाण्यात औपचारिक तक्रार दाखल केली.
तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश राळेभात यांनी वितरक पंकज उपाध्याय याला अटक केली. चौकशीत त्याने बिहारमधील एका कंपनीकडून ६,००० पट्ट्या खरेदी केल्याचे सांगितले; मात्र संबंधित कंपनीच्या नावाने बनावट बिल तयार केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. पुढील तपासात मुंबईतील वितरक विवेक राय याच्याकडून पुरवठा झाल्याचे समोर आले असून त्यालाही अटक करण्यात आली आहे.
झोन तिसरेचे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी सांगितले की, बनावट औषधांची निर्मिती करणाऱ्या मूळ उत्पादन युनिटचा शोध सुरू असून हे रॅकेट अनेक राज्यांमध्ये पसरले असण्याची शक्यता आहे. संपूर्ण साखळी उद्ध्वस्त करण्यासाठी तपासाचा वेग वाढविण्यात आला आहे.
औषध क्षेत्रातील तज्ज्ञांनी इशारा दिला आहे की, बनावट औषधे ही केवळ आर्थिक फसवणूक नसून थेट जीविताशी संबंधित गंभीर गुन्हा आहे. नागरिकांनी औषधे खरेदी करताना अधिकृत व विश्वासार्ह मेडिकल स्टोअरमधूनच औषधे घ्यावीत, बिल घ्यावे आणि संशयास्पद औषधांची माहिती तात्काळ प्रशासनाकडे द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
