‘शिवाजी महाराज जयंती’ निमित्ताने नंदुरबारमध्ये भव्य सांस्कृतिक महोत्सव

 


१८-१९ फेब्रुवारीला दोन दिवसीय कार्यक्रमांची मेजवानी

नंदुरबार, : महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि नंदुरबार जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त १८ व १९ फेब्रुवारी २०२६ रोजी दोन दिवसीय भव्य सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिवरायांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त आयोजित या महोत्सवात महाराष्ट्राची समृद्ध लोकसंस्कृती आणि शिवरायांच्या शौर्यगाथा उलगडल्या जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी शासकीय प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.


या सोहळ्याचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर येथे संपन्न होणार आहे. महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे स्थानिक युवा कलाकार गौरव माळी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी साकारलेली ‘3D-2Way’ रांगोळी. या भव्य रांगोळीच्या माध्यमातून शिवरायांच्या जीवनातील विविध ऐतिहासिक प्रसंग सजीव केले जाणार आहेत. शिवरायांच्या पराक्रमावर आधारित अनेक दर्जेदार कार्यक्रमांची रेलचेल या महोत्सवात पाहायला मिळणार आहे. ‘गाथा शिवरायांची’ : १९ फेब्रुवारी रोजी राज्य सांस्कृतिक पुरस्कार प्राप्त सुप्रसिद्ध लोकशाहीर शिवाजीराव पाटील यांचा शाहीरी पोवाड्यांचा विशेष कार्यक्रम होईल. ‘शिव स्वरांजली’ : ओमकार संगीत साधना विद्यालयाचे हेमंत पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून शिवरायांची संगीतमय कथा सादर केली जाईल. विशेष कला सादरीकरण : महाराजांच्या शौर्यावर आधारित गीते, पोवाडे आणि नृत्यनाट्यांचा समावेश असेल.


युवा पिढीत इतिहासाबद्दल अभिमान आणि देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. भव्य रांगोळी व चित्रकला स्पर्धा, समूह नृत्य स्पर्धा, ऐतिहासिक किल्ल्यांच्या प्रतिकृती व ‘किल्ले बनवा’ स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धांमुळे शालेय विद्यार्थी आणि स्थानिक कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी मिळणार असून, शिवरायांचे विचार घराघरात पोहोचवण्याचा प्रयत्न होणार आहे.


हा दोन दिवसीय सांस्कृतिक महोत्सव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, नेतृत्व आणि स्वराज्य संकल्पनेला अभिवादन करणारी एक प्रेरणादायी संकल्पना आहे. जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी, नागरिक आणि शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post