अजितदादा पवार क्रीडा नगरीत उपांत्य फेरीची रणधुमाळी

 


‘डायनॅमिक’ खो-खोचा जल्लोष; 

कै. उमेश शेणॉय स्मृती चषक स्पर्धेत उपांत्य फेरी रंगणार 

मुंबई (दादर) : दादर येथील कै. अजितदादा पवार क्रीडा नगरीत सुरू असलेल्या ‘डायनॅमिक’ व्यावसायिक खो-खो स्पर्धेने सध्या चांगलाच रंग धरला आहे. वेग, चपळाई आणि डावपेचांचा संगम अनुभवण्यासाठी प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत. मुंबई खो-खो संघटनेच्या मान्यतेने अमर हिंद मंडळ आयोजित कै. उमेश शेणॉय स्मृती चषक स्पर्धेत पुरुष व महिला गटातील सामने अत्यंत चुरशीचे ठरत आहेत.

उपांत्य फेरीत पुढील सामने रंगणार आहेत:

  • पश्चिम रेल्वे वि. बृहन्मुंबई महानगरपालिका

  • बँक ऑफ इंडिया वि. महाराष्ट्र पोष्ट

पश्चिम रेल्वेने नेवल डॉकवर २५-१७ असा ८ गुणांनी विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली. वृषभ वाघ, आदित्य गणपुले, मजहर जमादार, अमित पाटील आणि निखील सोडये यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली. महाराष्ट्र पोष्टने २९-२५ असा ४ गुणांनी महावितरणवर मात केली. लक्ष्मण गवस (१२ गुण) आणि शुभम उत्तेकर यांच्या दमदार खेळामुळे विजय शक्य झाला.



महिला गटात पश्चिम रेल्वे अव्वल स्थानी असून मुंबई पोलीस व महावितरण अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानी आहेत. मुंबई पोलिसांनी २४-१८ असा ६ गुणांनी विजय मिळवला. पायल पवार आणि श्रेया सनगरे यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. पश्चिम रेल्वेने एकतर्फी खेळ करत ३०-१४ असा मोठा विजय मिळवला. सुहानी धोत्रे हिने १४ गुणांची दमदार कमाई केली.


आता उपांत्य फेरीत पश्चिम रेल्वे, बृहन्मुंबई महानगरपालिका, बँक ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र पोष्ट यांच्यात विजेतेपदासाठी लढत रंगणार आहे. महिला गटातही अव्वल स्थानासाठी संघर्ष शिगेला पोहोचला आहे.दादरच्या क्रीडा नगरीत सध्या खो-खोचा उत्सवच साजरा होत आहे.




Post a Comment

Previous Post Next Post