शालांत परीक्षा दक्षता समिती बैठक संपन्न
छत्रपती संभाजीनगर : माध्यमिक (इयत्ता १० वी) आणि उच्च माध्यमिक (इयत्ता १२ वी) शालांत परीक्षा सुरु होत आहे. या परीक्षा पूर्णतः कॉपीमुक्त आणि भयमुक्त व्हावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली असून, परीक्षा पूर्णतः कॉपीमुक्त पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली. जिल्ह्यातील परीक्षा पारदर्शक व शिस्तबद्ध व्हाव्यात यासाठी विद्यार्थी, पालक, शिक्षक, प्रशासन व समाजातील सर्व घटकांनी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
या परीक्षांच्या पूर्वतयारीसाठी सोमवारीजिल्हाधिकारी कार्यालयात शालांत परीक्षा दक्षता समितीची बैठक पार पडली. या बैठकीत देण्यात आलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात इयत्ता १२ वी साठी १५९ परीक्षा केंद्रांवर ६५,५१६ विद्यार्थी, तर इयत्ता १० वी साठी २४० केंद्रांवर ६९,५३० विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. कोणत्याही केंद्रावर गैरप्रकार होऊ नयेत यासाठी आवश्यक त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून त्यांचे संनियंत्रण जिल्हास्तरावरून केले जाणार आहे. जिल्ह्यातील २,५२८ शाळांमध्ये सीसीटीव्ही व्यवस्था कार्यान्वित करण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत यांनी सांगितले की, पोलीस अधीक्षक व पोलीस आयुक्त यांच्या स्तरावरून परीक्षा केंद्रांवरील बंदोबस्ताचा आढावा घेण्यात यावा. तसेच परीक्षा केंद्र परिसरातील झेरॉक्स सेंटर बंद ठेवण्याची कारवाई काटेकोरपणे पूर्ण करावी.
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी स्पष्ट केले की, कोणत्याही केंद्रावर एकही कॉपी होणार नाही याची जबाबदारी केंद्रप्रमुखांची राहील. गैरप्रकार आढळल्यास संबंधित केंद्रप्रमुखांवर कारवाई करण्यात येईल आणि पुढील वर्षी त्या केंद्राची मान्यता रद्द करण्यात येईल. गतवर्षी अशा प्रकारांमुळे ६ केंद्रांची मान्यता रद्द करण्यात आली होती, असे त्यांनी सांगितले.
उन्हाचे दिवस लक्षात घेता, परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांसोबत आलेल्या पालकांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करावी व ती केंद्रापासून योग्य अंतरावर असावी, असे निर्देश देण्यात आले. बाहेरगावाहून येणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्राचा पत्ता अचूक देऊन किमान अर्धा तास आधी उपस्थित राहण्याची सूचना द्यावी, असेही सांगण्यात आले.
पोलीस, महसूल, शिक्षण विभाग, वीज कंपनी, शाळा व्यवस्थापन, पालक व शिक्षक अशा सर्व घटकांनी एकत्रितपणे कॉपीमुक्त अभियानासाठी योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी स्वामी यांनी केले. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी, उपजिल्हाधिकारी डॉ. सुचिता शिंदे, नीलम बाफना, एकनाथ बंगाळे, संतोष गोरड, शिक्षणाधिकारी (प्राथ.) जयश्री चव्हाण, शिक्षणाधिकारी (माध्य.) आश्विनी लाठकर, शिक्षणाधिकारी (योजना) अरुण शिंदे तसेच गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते.


