हजारो भाविकांनी घेतले श्री मच्छिंद्रनाथांचे दर्शन
कल्याण : “बोलो श्री मलंगबाबा की जय!” या जयघोषात सोमवारी माघी पौर्णिमेनिमित्त ठाणे जिल्ह्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कल्याण तालुक्यातील श्री मलंगगड यात्रेला मोठ्या भक्तिभावाने सुरुवात झाली. यानिमित्त महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री मलंगगडावर उपस्थित राहून श्री मच्छिंद्रनाथांचे दर्शन घेत मनोभावे पूजन-अर्चन केले.
वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केलेली ही परंपरा आजही प्रथेप्रमाणे सुरू असून, राज्यासह परराज्यातून हजारो भाविक दर्शनासाठी येथे दाखल झाले आहेत. यंदा भाविकांसाठी फ्युनिक्युलर रोप वे सुरू करण्यात आल्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच चालण्यास अडचण असलेल्या भाविकांसाठी दर्शन घेणे अधिक सोयीचे झाल्याचे मत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केले.
श्री मलंगगडावरील काही मालमत्तांबाबत न्यायालयात प्रकरण प्रलंबित असून, त्यावर लवकरच न्यायालयाचा निर्णय येईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. यावेळी आमदार राजेश मोरे, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, शिवसेना उत्तर महाराष्ट्र सचिव भाऊसाहेब चौधरी, ठाणे विधानसभा प्रमुख हेमंत पवार, ठाणे मनपाच्या नगरसेविका नम्रता भोसले जाधव तसेच शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



