स्वतःचे दुःख बाजूला ठेवत जाधव कुटुंबीयांच्या निवासस्थानी
तरडगाव, फलटण : उपमुख्यमत्री झाल्यानंतर सुनेत्रा अजित पवार यांनी सोमवारी पहिले कराड येथील प्रीतिसंगम येथे राज्याच्या महाराष्ट्राचे शिल्पकार आणि पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या समाधीस्थळी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर बारामती येथे झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांचे सुरक्षारक्षक विदीप जाधव यांचा मृत्यू झाल्यानंतर, स्वतःच्या दुःखावर मात करत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी सोमवारी तरडगाव (ता. फलटण) येथे जाधव कुटुंबीयांच्या निवासस्थानी भेट दिली.
या भेटीदरम्यान त्यांनी विदीप जाधव यांच्या पत्नी व मुलांच्या डोक्यावर मायेने हात फिरवत, कोणत्याही अडचणीत मी तुमच्यासोबत आहे, असे म्हणत कुटुंबीयांना धीर दिला. त्यांच्या या संवेदनशील आणि भावनिक भेटीमुळे उपस्थितांचे डोळे पाणावले.
या दु:खद घटनेनंतरही सुनेत्रा पवार यांनी जाधव कुटुंबीयांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीचे दर्शन घडवले. त्यांच्या या भेटीमुळे शोकाकुल कुटुंबीयांना मोठा मानसिक आधार मिळाला. विदीप जाधव यांच्या बलिदानाला आणि सेवेला संपूर्ण परिसरातून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कर्तव्यपथावर असतानाही अत्यंत संयम व मायेने जाधव कुटुंबीयांचे दुःख हलके करण्याचा प्रयत्न करत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी संवेदनशीलतेचा आदर्श घालून दिला.
