कल्याण : कल्याण येथील बुद्धिभूमी फाऊंडेशन परिसरात फ्लायओव्हर उभारणीसाठी सुरू करण्यात आलेल्या पिलरच्या कामावरून वाद निर्माण झाला आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (केडीएमसी) प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात काम सुरू केल्याचा आरोप बुद्धिभूमी व्यवस्थापनाकडून करण्यात आला आहे.
बुद्धिभूमी फाऊंडेशनचे प्रमुख भंते गौतमरत्न यांनी विकासकामांना विरोध नसून सहकार्याची भूमिका घेतली असल्याचे स्पष्ट केले. मात्र, परिसरातील वास्तूंना कोणतेही नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी, तसेच बाधित होणाऱ्या जागेच्या बदल्यात नियोजित प्रकल्पांच्या स्वरूपात नुकसानभरपाई द्यावी, अशा काही सूचना प्रशासनाला देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यासंदर्भातील निवेदने केडीएमसीकडे सादर करण्यात आल्याचा दावा व्यवस्थापनाने केला आहे.
दरम्यान, या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत केडीएमसी अधिकाऱ्यांसह बुद्धिभूमी व्यवस्थापन समितीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान संबंधित अडचणी समजून घेत प्रशासनाने सकारात्मक तोडगा काढावा, अशा सूचना देण्यात आल्या. तसेच या विषयावर स्थानिक खासदार श्रीकांत शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.
या पार्श्वभूमीवर केडीएमसी प्रशासन पुढे कोणता निर्णय घेते, याकडे स्थानिकांचे लक्ष लागले आहे.


