नवी मुंबईच्या महापौरपदी सुजाता पाटील तर उपमहापौरपदी दशरथ भगत

 

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी आज झालेल्या निवडणुकीत सुजाता सुरज पाटील यांची महापौरपदी तर दशरथ सिताराम भगत यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी पिठासन अधिकारी म्हणून निवडीची अधिकृत घोषणा केली व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला. सभेच्या प्रारंभी महापालिका सचिव श्रीमती संघरत्ना खिल्लारे यांनी पिठासन अधिकाऱ्यांचे स्वागत केले. महापौरपदासाठी दाखल अर्जांमधून नगरसेविका सरोज रोहिदास पाटील यांनी तर उपमहापौरपदासाठी दाखल अर्जांमधून नगरसेवक  आकाश बाळकृष्ण मढवी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने दोन्ही पदांवर बिनविरोध निवड झाली. निवड जाहीर झाल्यानंतर महापौर व उपमहापौर यांनी पदभार स्वीकारला. त्यानंतर सभागृहात विविध मान्यवरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी पुष्पगुच्छ देऊन महापौर व उपमहापौर यांचे अभिनंदन केले. अतिरिक्त आयुक्त सुनील पवारडॉ. राहुल गेठे, विविध विभागप्रमुख तसेच माजी खासदार संजिव नाईक, माजी आमदार संदीप नाईक आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. 

विकासाला प्राधान्य- महापौर पाटील

मनोगत व्यक्त करताना महापौर सुजाता पाटील यांनी स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण संवर्धन आणि वाहतूक नियोजन हे आपल्या कार्यकाळातील प्रमुख प्राधान्यक्रम असतील, असे सांगितले. तरुणांना संधी, महिलांची सुरक्षा व सन्मान, ज्येष्ठ नागरिकांचा आदर आणि सर्वसामान्य नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न राहतील, असे त्यांनी नमूद केले.गृहिणी ते नगरसेविका आणि महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदापासून महापौरपदापर्यंतचा प्रवास हा महिलांच्या प्रगतीशील वाटचालीचा पुरावा असल्याचे सांगत नवी मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

गतीमान विकासासाठी प्रयत्न - उपमहापौर भगत

उपमहापौर दशरथ भगत यांनी नवी मुंबईच्या अधिक वेगवान विकासासाठी उपमहापौरपद मोठी संधी असल्याचे सांगितले. सर्वांना सोबत घेऊन प्रामाणिकपणे काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांनी सर्व सदस्यांचे आभार मानले. 

 


Post a Comment

Previous Post Next Post