पुणे : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली हद्दीतील आडोशी बोगद्याजवळ मंगळवारी सायंकाळी सुमारे पाच वाजता प्रोपलेन गॅस वाहतूक करणारा टँकर उलटल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. टँकरमधून अत्यंत ज्वलनशील वायू तीन ठिकाणी गळत असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव मार्ग तात्काळ बंद करण्यात आला. तब्बल ३६ तासांच्या प्रयत्नांनंतर परिस्थिती नियंत्रणात आली असून गुरुवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास वाहतूक पूर्ववत करण्यात आली.
अपघातानंतर रात्री उशिरा केमिकल तज्ज्ञ आणि आपत्कालीन पथके घटनास्थळी दाखल झाली. गॅसची गळती थांबवणे आणि टँकरमधील वायू सुरक्षितरीत्या इतर चार टँकरमध्ये वर्ग करणे ही प्रक्रिया अत्यंत सावधगिरीने पार पाडण्यात आली. दरम्यान, द्रुतगती मार्गावर ३५ ते ४० किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरही कामशेतपर्यंत वाहतूक कोंडी पसरली. अनेक प्रवासी १२ ते १८ तास अन्न-पाण्याविना वाहनांत अडकून पडले.बुधवारी दुपारनंतर पुणे मार्गिकेवरून मुंबईकडे जाण्यासाठी एक लेन सुरू करण्यात आली होती. मात्र पूर्ण वाहतूक सुरळीत होण्यासाठी पहाटेपर्यंत प्रतीक्षा करावी लागली. काही ठिकाणी वाहनचालक गाड्यांत झोपल्याने किरकोळ कोंडीची स्थिती निर्माण झाली होती.
या घटनेनंतर एक्स्प्रेस वेवरील आपत्कालीन व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रवाशांच्या सुविधा आणि सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला असून सोशल मीडियावर नुकसानभरपाईबाबत चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी प्रशासनाची कमतरता मान्य केली. “हो, आमची व्यवस्था कमी पडली,” असे स्पष्ट वक्तव्य त्यांनी केले. टँकरमधील गॅस अत्यंत ज्वलनशील असल्याने कार्यवाही करताना विशेष खबरदारी घ्यावी लागली, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती, असे त्यांनी नमूद केले. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी टँकर चालकांचे विशेष प्रशिक्षण आणि इतर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.