लाडक्या नेत्याच्या अस्थीदर्शनाने जनसागर भावूक, अश्रूंनी डोळे पाणावले
कोल्हापूर / शेखर धोंगडे :
महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री कै. अजितदादा पवार यांच्या अस्थींचे आज कोल्हापुरात अत्यंत भावनिक वातावरणात दर्शन घेण्यात आले. सोमवारी सकाळी नऊ वाजल्यापासून मार्केट यार्ड येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयासमोरील मंडपात सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. आपल्या लाडक्या नेत्याच्या अस्थीकलशाचे दर्शन घेताना अनेकजण अश्रूंना आवरू शकले नाहीत.
महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस लतीफ तांबोळी सकाळी अस्थीकलश घेऊन कोल्हापुरात दाखल झाले. मंत्री हसन मुश्रीफ यांनी अस्थीकलश स्वीकारून कै. अजितदादांच्या प्रतिमेसमोर ठेवत पुष्पहार अर्पण करून विधिवत पूजन केले. अस्थीकलश दर्शनादरम्यान कै. अजितदादांचे ए. आय. तंत्रज्ञानाद्वारे तयार केलेले भाषण सुरू होते. “इतक्या लवकर मी काय जात नसतो तुम्हाला सोडून... मला बी अजित पवार म्हणतात...” हे शब्द कानावर पडताच अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. काहीजण हुंदके देत रडताना दिसले, तर अनेकांनी साश्रुनयनांनी अस्थीकलशाचे दर्शन घेत प्रतिमेला नम्र अभिवादन केले.
या भावपूर्ण दर्शनप्रसंगी मंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार धनंजय महाडिक, धैर्यशील माने, आमदार अमल महाडिक, माजी आमदार के. पी. पाटील, राजेश पाटील, डॉ. सुजित मिणचेकर, मानसिंगरावदादा गायकवाड, डॉ. नंदा बाभुळकर, गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष रणजीतसिंह पाटील, माजी महापौर आर. के. पोवार, माजी उपमहापौर परीक्षित पन्हाळकर, महेश सावंत, सुनील पाटील, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने, कागलचे माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, मुरगुडचे माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार, डॉ. जयंत प्रदीप पाटील, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, शहराध्यक्ष आदिल फरास, कार्याध्यक्ष अनिलराव साळोखे, माजी संचालक असिफ फरास, दत्ता पाटील-केनवडेकर, कागल नगराध्यक्षा सौ. सविता प्रताप उर्फ भय्या माने, नगरसेविका सौ. माधवी गवंडी, प्रकाश गवंडी, माजी नगरसेवक सतीश लोळगे, नगरसेविका ॲड. मानसी लोळगे, नगरसेवक नियाज खान, नंदकुमार गुरगर, परिवहनचे माजी सभापती प्रकाश कुंभार, राष्ट्रवादी शहर महिला अध्यक्ष रेखा आवळे, पूजा साळोखे, वैभव जाधव, युवराज साळोखे, नागेश फराडे, जहांगीर अत्तार, बाबू घाटगे, ओंकार माने, कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष सूर्यकांत पाटील, सौ. जहिदा मुजावर, उदयराव जोशी, राष्ट्रवादी इचलकरंजी शहराध्यक्ष सुहास जांभळे, कार्याध्यक्ष अमित गाताडे, करवीर तालुकाध्यक्ष शिवाजीराव देसाई, करवीर विधानसभा अध्यक्ष संभाजीराव पाटील, दक्षिण विधानसभा अध्यक्ष आप्पासाहेब धनवडे, गगनबावडा तालुकाध्यक्ष दिलीप पाटील, इचलकरंजी नगरसेवक प्रकाश पाटील, जयसिंगराव चव्हाण, दिनकरराव कोतेकर, प्रवीण काळबर आदींसह विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.