इतिहास, कला आणि संशोधनाचा अनोखा संगम साकार झाला
डोंबिवली \ शंकर जाधव : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कल्याणमध्ये संशोधक-कलावंत डॉ. दिनेश गुप्ता आनंदश्री यांनी अनोखी कलाकृती साकारली आहे. ४२२ ऐतिहासिक किल्ल्यांच्या नावांपासून महाराजांचे तेजस्वी पोर्ट्रेट उभे करण्यात आले असून ही कलाकृती इतिहास, कला आणि राष्ट्रप्रेरणेचा प्रभावी दस्तऐवज ठरली आहे.
डॉ. गुप्ता यांनी या कलाकृतीसाठी सलग दोन दिवस परिश्रम घेतले. सर्वात आव्हानात्मक टप्पा होता ४२२ किल्ल्यांची अचूक नावे, त्यांचा ऐतिहासिक संदर्भ आणि त्या सर्वांना महाराजांच्या तेजस्वी व्यक्तिमत्त्वात कलात्मकरीत्या गुंफणे. प्रत्येक अक्षरात इतिहासाची साक्ष आणि प्रत्येक ओळीत पराक्रमाची गाथा जिवंत झाली आहे.
कलाकृतीची प्रेरणा डॉ. गुप्ता यांना मागील वर्षी मिळाली, जेव्हा शिवकालीन १२ ऐतिहासिक किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा दर्जा जाहीर करण्यात आला. त्या क्षणी त्यांनी ठरवले की महाराजांच्या पराक्रमाचे प्रतीक असलेले सर्व किल्ले एका चित्रात साकारून भावी पिढ्यांसाठी जिवंत इतिहास निर्माण करायचा.
ही कलाकृती सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे आणि इतिहासप्रेमी तसेच कला रसिक यांना प्रेरणा देत आहे.
