ठाणे : छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त ठाणे जिल्हा परिषद कार्यालयात गुरुवारी उत्साहपूर्ण कार्यक्रम संपन्न झाला. प्रकल्प संचालकांचे कार्यालय, टीएमसी पार्किंग प्लाझा, ८ वा मजला, लक्ष्मी नगर, ज्युपिटर हॉस्पिटलजवळ आयोजित या कार्यक्रमात अधिकारी व कर्मचारी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे यांनी पुष्पहार अर्पण करून केली. उपस्थितांनीही पुष्पांजली अर्पण करून शिवरायांना अभिवादन केले.
छायादेवी शिसोदे यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा आढावा घेत कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि लोकाभिमुख प्रशासनाची जाणीव ठेवण्याचे संदेश दिले. त्यांनी सांगितले की, शिवरायांच्या राष्ट्रप्रेम, धैर्य आणि संघटन कौशल्यातून प्रेरणा घेऊन विकासकामे अधिक परिणामकारकपणे पूर्ण करणे ही खरी शिवजयंती साजरी करण्याची भावना आहे.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांनी मनोगतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, दूरदृष्टी आणि लोककल्याणकारी धोरणांचा उल्लेख करत त्यांच्या आदर्शांवर चालण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, स्वराज्य हे न्याय, समता आणि पारदर्शक प्रशासनाचे प्रतीक होते आणि त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन शासनाच्या योजना प्रभावीपणे राबविणे व जनतेच्या सेवेस तत्पर राहणे ही खरी शिवजयंती साजरी करण्याची खरी भावना आहे.
कार्यक्रमास सहाय्यक प्रकल्प अधिकारी आरती गगे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी हर्षद मोरे, विस्तार अधिकारी संतोष पांडे, वरिष्ठ सहाय्यक नारायण उंबरगोंडे, कनिष्ठ सहाय्यक विशाल कोदर्लीकर, डेटा ऑपरेटर तुषार वाणी आणि इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे वातावरण उत्साहपूर्ण आणि राष्ट्रभक्तीने नटलेले होते. उपस्थितांनी शिवरायांच्या विचारांचे स्मरण करून समाजहितासाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.
