१३ ठिकाणी गैरवापर उघड; २८ सिलेंडर जप्त, ३ गुन्हे दाखल
बीड : जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल तसेच घरगुती एलपीजी गॅसचा पुरवठा सुरळीत राहावा आणि घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष तपासणी मोहीम राबवली. या मोहिमेत १९ पथकांच्या माध्यमातून जिल्हाभर तपासणी करण्यात आली असून अनेक ठिकाणी गैरवापर उघडकीस आला आहे.
या तपासणी मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील एकूण २०३ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १३ ठिकाणी घरगुती गॅसचा अवैध वापर आढळून आला. या कारवाईत २८ गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले असून ३ प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच १० प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
नागरिकांच्या तक्रारींसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे. गॅसच्या अवैध वापराबाबत कोणतीही माहिती किंवा तक्रार असल्यास नागरिकांनी टोल फ्री क्रमांक १०७७ वर संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे स्पष्ट करत अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अनावश्यक साठा करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी नागरिकांना केले आहे.


