कोल्हापूरमध्ये महापौरांचा ५ मार्चला जनता दरबार

 


कोल्हापूर महानगरपालिकेचे तिहेरी उपक्रम जाहीर; जनता दरबार, CSR आवाहन आणि ‘शेणी दान’ अभियान

कोल्हापूर : शहराचा सर्वांगीण विकास, नागरिकांच्या समस्यांचे तातडीने निराकरण आणि पर्यावरण संरक्षण या उद्दिष्टांसाठी ने तीन महत्त्वपूर्ण उपक्रम जाहीर केले आहेत. महापौर रुपाराणी संग्रामसिंह निकम यांनी या उपक्रमांची माहिती देत नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले आहे.

नागरिकांच्या तक्रारी आणि सूचनांचे प्रत्यक्ष ऐकून तत्काळ कार्यवाही करण्यासाठी ५ मार्च रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत महानगरपालिका मुख्य इमारतीसमोरील कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौक येथे ‘जनता दरबार’ आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमातून नागरिकांना प्रशासनाशी थेट संवाद साधण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

याशिवाय शहर सुशोभीकरणासाठी प्रमुख चौकांचे आधुनिकीकरण, हरित पट्ट्यांची उभारणी आणि महिलांसाठी अत्याधुनिक ‘स्मार्ट टॉयलेट्स’ उभारण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे. शहरातील उद्योग, व्यावसायिक संस्था आणि उद्योजकांनी त्यांच्या CSR निधीतून या विकासकामात सहकार्य करावे, असे आवाहन महापौरांनी केले आहे. सार्वजनिक-खासगी भागीदारीतून शहराचा चेहरामोहरा बदलण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, होळीच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक सण साजरा करण्यासाठी ‘शेणी दान’ अभियान हाती घेण्यात आले आहे. वृक्षतोड टाळण्यासाठी लाकडांऐवजी शेणींचा वापर करावा तसेच स्मशानभूमीसाठी शेणी दान करून पर्यावरण संवर्धनात हातभार लावावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

नागरिकांच्या सहभागातून कोल्हापूरला स्वच्छ, हरित आणि आदर्श शहर बनविण्याचा निर्धार महानगरपालिकेने व्यक्त केला आहे.




Post a Comment

Previous Post Next Post